पहिल्या टप्प्यात ४ केंद्रांवर देणार लस, महापालिकेची यंत्रणा सज्ज, लस केंद्रावर गर्दी न करण्याचे पालिकेचे आवाहन
ठाणे : ठाणे शहरात उद्या दिनांक १६ जानेवारीपासून कोविड १९ लसीकरण मोहिमेला सुरूवात होत असून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे. एकूण चार केंद्रांवर ही लसीकरण मोहिम सुरू करण्यात येणार असून नागरिकांनी महापालिकेकडून लसीकरणासाठीचा संदेश आल्याशिवाय अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.
ठाणे शहरामध्ये रोझा गार्डनिया, घोडबंदर रोड, कोरस, कळवा आणि कौसा आरोग्य केंद्र अशा एकूण चार केंद्रांवर ही लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात एकूण ४०० आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे.
लसीकरणासाठी महापालिकेच्यावतीने एकूण २० केंद्रे उभारण्यात आली असून या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली. लवकरच ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येतील असेही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.
दरम्यान लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ज्या ज्या कर्मचारी किंवा आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण करण्याबाबतचा संदेश आला आहे त्यांनीच निर्धारित केलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहायचे असून नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
महापौर आणि आयुक्त देणार भेट
उद्यापासून लसीकरण मोहिमेला प्रांभ होणार असून लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये यासाठी महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा हे स्वतः या केंद्रांवर फिरणार आहेत.
487 total views, 1 views today