रखडलेले एसआरए प्रकल्प डॉ. आव्हाडांनी लावले मार्गी

थकलेले भाडे बिल्डरकडून रहिवाशांना मिळाले

ठाणे : ठाणे शहरातील रखडलेल्या दोन एसआरए प्रकल्पांना गृह निर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे उर्जितावस्था मिळाली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पाठपुरावा केल्यामुळे जवळपास बंदावस्थेत गेलेले हे दोन्ही प्रकल्प आता लवकरच सुरु होणार असून रहिवाशांना त्यांचे थकलेले भाडेदेखील डॉ. आव्हाड यांच्या हस्ते धनादेशाच्या माध्यमातून देण्यात आले.
ठाणे शहरातील खोपटच्या ब्राम्हणदेव सोसायटी आणि माजीवड्यातील सम्राट अशोक नगर येथे झोपडपट्टी पुन:र्वसन योजनेंतर्गत विकासकामे करण्यात येत आहेत. माजीवड्यामध्ये सुमारे ४५० तर खोपटच्या ब्राम्हणदेव सोसायटीतील ४५ रहिवाशी या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांचे काम थांबले होते. तसेच, रहिवाशांना विकासकाकडून देण्यात येणारे भाडेही मिळालेले नसल्याने रहिवाशी हवालदील झाले होते. या दोन्ही वस्तीमधील रहिवाशांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती. परांजपे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करुन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून विकासक आणि रहिवाशी यांच्यामध्ये संयुक्त बैठक घेतली. या बैठकीमध्ये सदर प्रकल्पांना तत्काळ सुरुवात करण्यात यावी अन् रहिवाशांना त्यांचे घरभाडे अदा करावेत, अशा सूचना डॉ. आव्हाड यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, शुक्रवारी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते या रहिवाशांना त्यांच्या घरभाड्याचे धनादेश अदा करण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी कार्यकारी अभियंते नितीन पवार आणि अभियंते राजकुमार पवार यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, ठाण्यातील अनेक वस्त्यांचा एसआरए मार्फत होणारा विकास थांबला असल्याचे चित्र दिसून येत आहे. खोपट येथील ब्राम्हणदेव गृहनिर्माण संस्था व माजीवडा येथील सम्राट अशोक नगरचे तथागत आणि समभाव गृहनिर्माण संस्था येथील रहिवाशांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आनंद परांजपे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे रहिवाशी आणि विकासक यांच्यात चर्चा घडवून हा प्रश्न निकाली काढला आहे. सध्या बांधकाम व्यावसायात गती येत आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन विकासक हे प्रकल्प लवकर पूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे.
यावेळी आनंद परांजपे यांनी, डॉ. आव्हाड यांनी गृहनिर्माण मंत्रीपद स्वीकारल्यानंतर ठाण्यातील रखडलेले विकास प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरविले होते. गरीबांना त्यांचे हक्काचे घर देण्याचे त्यांनी ठरविले होते. याच उद्देशाने त्यांनी विकासक आणि रहिवाशांमध्ये बैठका घेऊन सदरच्या रखडलेल्या प्रकल्पांना चालना दिली आहे.

 302 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.