मातृत्वानंतर सी-सॉ अनुभवला – मधुराणी प्रभुलकर

म्हाळगी व्याख्यानमालेत प्रकट मुलाखतीत उलगडले ‘स्त्री’ चे विविध पैलु.

ठाणे : मातृत्वाची जबाबदारी आल्यानंतर दोलायमान स्थितीमुळे काही काळ आपणही सी – सॉ अनुभवला. तेव्हा,निराश न होता चिकाटीने आपण आपलं सर्वस्व कलेला अर्पण करण्याची प्रेरणा आईकडून मिळाली. अशी जाहिर कबुली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आईची भूमिका साकारणाऱ्या मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले- प्रभुलकर यांनी दिली. ठाण्यातील सरस्वती सेंकडरी स्कुलच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेतील आठवे आणि अखेरचे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. आकाशवाणी, दुरदर्शन कलावंत माधुरी ताम्हाणे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत रिल लाईफ व रिअल लाईफमध्ये मधुराणी काय काय करते ? यातील विविध पैलु श्रोत्यांसमोर उलगडले. प्रारंभी प्रास्ताविकात, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी, गेली ३५ वर्षे ज्ञान,प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसुत्रीनुसार व्याख्यानमालेचा हा ज्ञानदीप तेवत ठेवल्याचे स्पष्ट करून या व्यासपिठावर आलेल्या वक्त्यांची भरभराटच झाली. अशी महतीही सांगितली. तर, आभार प्रदर्शन शरद पुरोहीत यांनी केले. याप्रसंगी, मालिकेचे दिग्दर्शक रविंद्र करमरकरसह अपूर्वा गोरे, सीमा घोगळे आणि गौरी कुलकर्णी या सहकलाकार आवर्जुन उपस्थित होत्या. 
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आत्मभान आलेल्या आईच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनलेल्या मधुराणी गोखले – प्रभुलकर यांच्या अष्टपैलु कारकिर्दीचा जीवनपट मुलाखतीत उलगडला. शालांत परिक्षेत गुणवत्ता यादीत येऊनही डॉक्टर, इंजिनियर न होता कला शाखेची कास धरून गृहिणी ते गायन, संगीत, नृत्य, लेखन, कविता, अभिनय, मुलाखतकार आणि जाहिरातीतील मॉडेल अशा नानाविध कलाप्रकारांची पाईक असलेली मधुराणी, सातत्याचा शोध घेत प्रत्येक कलेचा पुरेपूर आनंद घेत असल्याने जास्त परिपूर्णतेने आयुष्य जगत असल्याचे सांगतात. वयाच्या ६५ व्या वर्षी संगीत विषयात पीएचडी करणाऱ्या आईची प्रेरणा घेऊन वाटचाल करताना घरात नवरा प्रमोद आणि चिमुकली मुलगी स्वरालीचीही योग्य साथ मिळते. विशिष्ट तासांची नोकरी करणे वेगळं, या क्षेत्रासाठी योगदान देताना मुलीच्या आठवणीने जीव तुटतोच, दुरावा जाणवतो. ही सल अभिनयातुन उतरते. पण अजिबात काळजी वाटत नाही, कारण माझ्या वरताण असलेला पती, मुलीचा चांगला संभाळ करत असल्याने मी निर्धास्त असते. अशी कौटुंबिक आठवण जागवताना मधुराणीने लॉकडाउन काळात कधीच न केलेल्या गोष्टी कराव्या लागल्याचे सांगून, १७ वर्षाच्या संसारात १७ वेळाही पोळ्या केल्या नाहीत. अशी कबुलीही दिली. अभिनय, संगीत, मुलाखतकार, गायनासोबतच कवितेचं पान, रंगपंढरी, कलाकारांवर आधारीत आपण ह्यांना ऐकलत का ? अशा उपक्रमांसह तब्बल ८७ ऑडीशन्स दिल्यानंतर जाहिरात क्षेत्रात कसे यश मिळवले. याचा उहापोह करताना आजकालच्या शिक्षणाच्या गोंधळाबाबत टीकाही केली. दरम्यान, आई बनल्यानंतर आयुष्यात उदभवलेल्या दोलायमान स्थितीबाबत भाष्य करताना, मधुराणीने प्रत्येक कलाकाराला सी – सॉ अनुभवावा लागत असल्याचे सांगत, या मालिकेपुर्वी मधला काळ आपणही सी – सॉ चा अनुभव घेतल्याची कबुली दिली.
बदलाची सुरुवात स्वतःपासुन करा
स्त्री म्हटले की समाजात एक चित्र बिंबवलेले आहे, हे काय म्हणतील, ह्यांना काय वाटेल यातच आपण अडकलोय. असे विचार व्यक्त करुन मधुराणी हिने, स्त्री म्हणजे सातत्याने आक्रस्ताळेपणा करणे, झेंडे घेऊन फिरणे नव्हे. तर, हा बदल स्वतःपासुन केल्यास हळुहळु कुटुंबात होईल. त्यामुळे समाजात एक टक्का जरी बदल झाला तरी ते महत्वाचे ठरेल असे सांगितले.

 309 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.