शैक्षणिक शुल्क न भरल्याने शाळेने नाकारला विद्यार्थ्याचा बोर्डाचा अर्ज

दिव्यांग हक्क आणि अधिकार अधिनियम २०१६ नुसार कोणत्याही दिव्यांगांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याने शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची पालकांची मागणी

ठाणे : लॉकडाऊनमुळे दिव्यांग पित्याला आपल्या मुलाचे शैक्षणिक शुल्क अदा न करता आल्याने मुंब्रा-कौसा येथील एका शाळेने चक्क या विद्यार्थ्याचा बारावीचा अर्जच भरण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी सदर दिव्यांग पालकाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे.
काँग्रेसच्या दिव्यांग सेलचे ठाणे अध्यक्ष मोहम्मद युसूफ मोहम्मद फारुख खान यांचा मुलगा मुंब्रा- कौसा येथील सेंटी मेरी महाविद्यालयामध्ये इयत्ता १२ वी मध्ये खान यांचा मुलगा शिकत आहे. या शाळेच्या व्यवस्थापनाने वर्षभराची १५ हजार रुपये फी भरण्याची सूचना केली होती. मात्र, लॉकडाऊनच्या काळातही खान यांनी पत्नीचे स्त्री धन विकून मिळालेले ५ हजार रुपये शाळेचे शुल्क म्हणून अदा केले. मात्र, लॉकडाऊनमध्ये माझी त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली टपरी बंद राहिल्याने ते उर्वरित फी भरु शकले नाहीत. विशेष म्हणजे, या काळात ऑनलाईन शिक्षणही देण्यात येत नव्हते. असे असताना खान यांचा मुलगा शाळेत अर्ज भरण्यासाठी गेला असता, त्याला अपमानित करण्यात आले. त्यामुळे विचारणा करण्यासाठी खान हे गेले असता त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे देऊन बारावीचा अर्ज भरणार नसल्याचे सांगण्यात आले. या महाविद्यालयामध्ये दिव्यांगांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसतानाही त्यांना पुन्हा शाळेत येण्याविषयी फर्मावण्यात आले. तसेच. त्यांना अपमानितही करण्यात आले.
या प्रकरणी दिव्यांग हक्क आणि अधिकार अधिनियम २०१६ नुसार कोणत्याही दिव्यांगांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याने शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी मोहम्मद युसूफ मोहम्मद फारुख खान यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

 537 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.