भाजयुमोची महेबूब शेख यांना ठाणे जिल्हा बंदी

सारंग मेढेकर यांनी केली घोषणा,राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक प्रदेशाध्यक्षांच्या अटकेसाठी भाजयुमोचे आंदोलन

ठाणे : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर अटकेसह कठोर कारवाईच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच महेबूब शेख यांना ठाणे जिल्हा बंदी जाहीर केली.
औरंगाबादेतील एका उच्चशिक्षित तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी महेबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या कृपाशिर्वादामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या संदर्भात सत्ताधारी नेत्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप होत आहे, या पार्श्वभूमीवर भाजयुमोचे ठाणे शहराध्यक्ष सारंग मेढेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच महेबूब शेख यांच्या अटकेसह कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात युवा मोर्चा प्रदेश सचिव ओमकार चव्हाण व महिला आघाडीच्या शहराध्यक्षा व नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्यासह युवा मोर्चा व महिला मोर्चा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राज्याचे गृहमंत्री ज्या पक्षाचे आहेत. त्याच पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्याकडून महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. या प्रकरणी महेबूब शेख यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
सुप्रिया सुळे, रुपाली चाकणकर यांचे प्रकरणाबाबत मौन का?
महिला अत्याचाराबरोबरच विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून विविध विषयांवर प्रतिक्रिया दिल्या जातात. मात्र, महेबूब शेखकडून झालेल्या अत्याचाराबाबत सुप्रिया सुळे, रुपाली चाकणकर यांनी मौन का धारण केले आहे. हाथरस प्रकरणानंतर उत्तर प्रदेश सरकारविरोधात ओरड करणारे महाविकास आघाडीतील नेते आता कोठे गायब झाले आहेत, असा सवाल भाजयुमोचे शहराध्यक्ष सारंग मेढेकर यांनी केला.

 313 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.