टोरंट राबविणार अभय योजना

वीज मीटरचे सर्व प्रकार लोकांच्या समोर ठेवून लोकांच्या पसंतीनुसार मीटर लावण्यात येणार आहेत. बिलांच्या संदर्भातील तक्रारींबाबत लवकरच तोडगा काढण्यात येणार असून अभय योजनेमार्फत वीज बिलांच्या व्याजावर दिलासा देणार

ठाणे : टोरंटकडून पाठविण्यात येणार्‍या वीज देयकांबाबत अभय योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. लवकरच या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंब्रा-कौसा भागात विशिष्ट वीजमीटर बसविण्याची सक्ती करण्यात येत आहेत. तसेच, वीज बिल न भरणार्‍यांना नोटीसा बजावण्यात येत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मुंबई येथील निवासस्थानी महावितरण, टोरंटच्या अधिकार्‍यांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शहराध्यक्ष आनंद परांजपे, सय्यद अली अश्रफ, कळवा- मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान, ज्येष्ठ नगरसेवक शानू पठाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, टोरंटकडून या पुढे विशिष्ट वीजमीटर लावण्याची सक्ती करण्यात येणार नाही. तसेच, वीज मीटरचे सर्व प्रकार लोकांच्या समोर ठेवून लोकांच्या पसंतीनुसार मीटर लावण्यात येणार आहेत. बिलांच्या संदर्भातील तक्रारींबाबत लवकरच तोडगा काढण्यात येणार असून अभय योजनेमार्फत वीज बिलांच्या व्याजावर दिलासा देण्यात येणार आहे. या संदर्भात वीज मंत्री नितीन राऊत आणि संचालक असीम गुप्ता यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच अभय योजनेचे स्वरुप जाहीर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 323 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.