कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुभारंभ
शहापूर ( शामकांत पतंगराव ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊन पासून ते आजपर्यंत सुमारे सात महिने बंद पडलेला किन्हवली येथील रविवारचा आठवडे बाजार आजपासून पुन्हा सुरू झाला आहे.बाजार सुरु व्हावा म्हणून ग्राहकांमध्ये कमालीची उत्सुकता होती मात्र घाट माथ्यावरून येणारे व्यापारी न आल्याने बाजाराला जरी थंड प्रतिसाद मिळाला असला तरी आगामी काळात हा बाजार मोठ्या प्रमाणात भरेल अशी शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आशा आहे.
जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला असताना सर्वत्र लॉकडाऊन घेण्यात आले.तेव्हापासून ते आज पर्यंत बंद केलेले आठवडे बाजार सुरू करण्याबाबत सरकारी अद्यादेश आल्याने किन्हवली येथे दर रविवारी भरणारा आठवडी बाजार आजपासून शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजाराच्या आवारात भरू लागला.
किन्हवली येथे दर रविवारच्या आठवडा बाजारात शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात विविध प्रकारची दुकाने लावली जातात. घाटमाथ्यावरील जुन्नर, आळेफाटा, बनकरफाटा,ओतूर, नाशिक आदी ठिकाणचे भाजीपाला, कडधान्य, गृहपयोगी, उल्हासनगर मधून कपड्याचे व्यापारी,वसई,बोईसर, पनवेल येथून सुकी मच्छिची या बाजारात दुकाने थाटतात.बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांकडून ताजी पण स्वस्त दराने भाजीपाला मिळत असल्याने ग्राहक एकच गर्दी करतात परंतु आजचा हा पहिलाच आठवडी बाजार असून त्याची जाहिरात न झाल्याने बाहेरचे व्यापारी आले नाहीत या मुळे बाजारा बाबत कमालीची उत्सुकता असलेल्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरली.दरम्यान शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश भांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आजच्या किन्हवली येथील आठवडी बाजाराचा शुभारंभ केल्याने ग्राहक व व्यापाऱ्यांनी धन्यवाद दिले.
“आठवडी बाजारात दुकाने मांडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती लवकरच कठडे बांधणार असून सध्या केलेल्या पर्यायी जागेत दुकाने लावावीत अशी दुकानदारांना सूचना दिल्या आहेत” –सुनील रामचंद्र धानके
संचालक -शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
412 total views, 2 views today