हिंदू जनजागृती समितीने दिली ठाणे, बदलापूर आणि अंबरनाथ येथील पोलीस-प्रशासनांना निवेदने
ठाणे : नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होत आहेत. गंभीर बाब म्हणजे या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणार्या युवापिढीचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावणे, बीभत्स गाण्यांच्या तालावर अश्लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड-विनयभंग-बलात्कार आदी कुकृृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवर येतो. यासाठी ३१ डिसेंबरच्या दिवशी आपल्या भागातील किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे आणि पार्ट्या करणे यांस प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा तसेच या ठिकाणी पोलीस दलाचे नियोजन करण्याची मागणी करणारी निवेदने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने बदलापूर आणि कापूरबावडी (ठाणे) येथील पोलीस ठाण्यांत तसेच अंबरनाथ तहसीलदार कार्यालय येथे देण्यात आली. याप्रमाणेच मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील पोलीस-प्रशासनालाही या आशयाची निवेदने देण्यात आली.
यंदाच्या वर्षी कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे. अनेक तज्ञ कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवत आहे. अशा वेळी ३१ डिसेंबरला पार्ट्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी किंवा ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) बंदी घालावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
नववर्ष ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे तर गुढीपाडव्याला साजरे करण्याचे हिंदूंना आवाहन
हिंदू बांधवांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे; हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे ! असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या आठवड्यात घेण्यात आलेली व्याख्याने आणि साप्ताहिक धर्मशिक्षणवर्गांतून करण्यात आले. या ऑनलाईत कार्यक्रमांतून ठाणे जिल्ह्यातील शेकडो लोकांमध्ये जागृती करण्यात आली. १ जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. आजमितीला जगभरात ख्रिस्ती राष्ट्रे बहुसंख्य असल्याने आणि या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने तेथील संस्कृतीचा पगडा जगभर पहायला मिळतो. त्यामुळे ‘१ जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे’, असा अपसमज निर्माण झाला आहे; भारतीय संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करणे हे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक या सर्वच दृष्टीने श्रेयस्कर आणि फायदेशीर आहे.
406 total views, 1 views today