“दलाल” म्हणून संभावना केल्यामुळे देशातील व्यापारी नाराज

शेतकरी आंदोलनादरम्यान व्यापाऱ्यांसाठी अपमानास्पद शब्दप्रयोग वापरल्याबद्दल कॅट उत्तर देणार

मुंबई : दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात देशातील व्यापाऱ्यांचा दलाल म्हणून सर्रासपणे अपमानास्पद उल्लेख केला जात असल्याने देशातील व्यापारी नाराज झाले आहेत. व्यापाऱ्यांची पालक संघटना कॉंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (,कॅट) ही बाब गांभीर्याने घेत आपला आक्षेप नोंदवला आहे. जीवनभर व्यवसायाच्या रहाटगाड्यात स्वतःला जोखडून देशाला महसुल मिळवुन देत आहेत. त्या व्यापाऱ्यांची दलाल म्हणून हेटाळणी करत त्यांचा अपमान करणे खेदजनक असून त्याला उत्तर देणार असल्याचे कॅटने स्पष्ट केले.
कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला रास्त भाव न मिळाल्यास त्याचे खापर दलाल म्हणून उल्लेख करत व्यापाऱ्यांवर फोडता कामा नये. हा सगळा दोष देशातील कृषी व्यवस्थेतील उणीवा , प्रशासकीय व्यवस्थेचा आहे. यामुळे देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यानंतरही शेतकऱ्यांना तोट्यात शेती करावी लागत असल्याचे सहजपणे विसरले जाते. सगळेच राजकीय पक्ष दलाल म्हणून व्यापाऱ्यांचा उल्लेख करत आहेत. त्यांच्या या अपमानास्पद शब्दप्रयोगाला योग्यवेळी उत्तर देण्याची व्यापाऱ्यांमध्ये ताकद आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया आणि सरचिटणीस प्रविण खंडेलवाल यांनी दलाल संपवून टाकू या शेतकरी आंदोलनातील उल्लेखाबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी आंदोलनात दलाल म्हणून ज्यांची हेटाळणी केली जातेय ते देशातील व्यापारी आहेत.  हेच व्यापारी शेती साठी शेतकऱ्यांना मदत करत असतात. देशातील सरकारी बाबू आणि बँका मदत नाकारतात तेव्हा हेच व्यापारी बियाणे खरेदी करण्यापासून ग्राहकांपर्यत त्यांचा माल पोहचविण्याचे कामात शेतकऱ्यांसोबत असतात. अशा लोकांचा दलाल म्हणून उल्लेख करणे अपमानकारक आहे.
शेतकरी कायदा लागू झाल्यावर कॉर्पोरेट घराणी की अन्य लोकं दलाल आहेत हे स्पष्ट व्हायला पाहिजे. त्याठिकाणी कामाला असलेले व्यवस्थापक, कलेक्शन सेंटर, सॅम्पलर, ग्रेडर, मजदूर, ओझी उचलणारे कामगार दलाल नसणार? त्यांना दिला जाणारा पगार, कमिशन किंवा ब्रोकरेज ग्राहकांकडून वसुक करणार ना? ही रक्कम शेती व्यवस्थेतील नसणार? का हे सगळे दान व्यवस्थेत मोजणार. देशातील व्यापाऱ्यांची अपमानास्पद हेटाळणी करायला नको. शेतीची पूर्ण वितरण व्यवस्था व्यापाऱ्यांवर अवलंबून आहे. सरकारी वितरण व्यवस्था देशात अपयशी ठरली आहे. व्यापाऱ्यांचा मोठा वर्ग देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक आहेत. अशा वर्गाला दलाल म्हणणे, त्यांना संपवून टाकू असे बोलणे योग्य आहे का? सरकार, सर्व राजकिय पक्षांनी याचा गंभीरपणे विचार करावा.
ज्यांचा दलाल म्हणून सहज उल्लेख केला जातोय तोच वर्ग संपला तर काय परिणाम होतील. देशात बेरोजगारी किती वाढेल. अर्थव्यवस्थेला किती मोठा फटका बसेल. एकाला खूश करण्यासाठी अन्य दुसऱ्या मोठ्या वर्गासाठी अपमानस्पद शब्द प्रयोग करणे हे त्यावर अन्यायकारक असल्याचे सुरेशभाई ठक्कर म्हणाले.

 307 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.