ठाणे – घोडबंदर रोड आता होणार ट्रॅफिक फ्री

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश.
ठाणे :  महानगरपालिकेची हद्द संपते व मीरा भाईंदर महापालिकेची हद्द सुरु होते त्याठिकाणी अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल पर्यंतच्या नव्याने होणाऱ्या उन्नत मार्गाची पहाणी आज खासदार राजन विचारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासमवेत केली.
घोडबंदर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टिकुजीनी वाडी ते बोरीवली या भुयारी मार्गाबाबत गती देण्यासाठी दिनांक १० ऑगस्ट २०१६ रोजी संसदेत खासदार राजन विचारे यांनी शून्य प्रहर मार्फत मुद्दा उपस्थित केला होता, या कामाला वन खात्याची परवानगी न मिळाल्याने विलंब लागत होता. या प्रकल्पाच्या तसेच घोडबंदर रोडच्या वाहतूक कोंडीवर काय उपाययोजना संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे असा हि सवाल त्यावेळी केला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत तातडीने गायमुख ते फाउंटन हॉटेल असा ४ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्गाचा प्रस्ताव बनविण्यात आला व  २४ नोव्हेंबर २०१७ रोजी राज्य मंत्रिमंडळाची सदर प्रस्तावास ६६७ कोटीची प्रशासकीय मान्यता मिळवली.
आज खासदार राजन विचारे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत एकत्रित पाहणी व बैठक आयोजित करून या प्रकल्पाला चालना व गती दिली. तसेच या प्रकल्पासाठी लागणारी वन खात्याची जागा मिळवून देण्यासाठी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक  सुनील लिमये यांनी सदर जागा महिन्याभरात मिळवून देऊ असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले. खासदार राजन विचारे यांनी येणाऱ्या नवीन वर्षात या कामाची सुरुवात करू असे सांगितले.
या पाहणी दौऱ्याला आमदार गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, नगरसेवक राजू भोईर, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल सावंत, शहर प्रमुख लक्ष्मण जंगम, पप्पू भिसे, जयराम मेसे, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक नरेश मनेरा, सिद्धार्थ ओवळेकर व इतर शिवसैनिक, पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एम एस आर डी सी चे मुख्य अभियंता  सोनटक्के, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक मुंबई पश्चिम प्रदेशचे सुनील लिमये, उपमुख्य वन संरक्षक ठाणे गजेंद्र हिरे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कांदळवन तसेच मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, पोलीस आयुक्त सदानंद दाते, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखेचे अमित काळे, राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी अग्रवाल व इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.
कसा असणार आहे हा प्रकल्प
१. अस्तित्वातील असलेल्या २+२ या रस्त्याचे रुंदीकरण करून या रस्त्यात साडे सहा मीटर उंचीचा पिलेर उभे करून त्यावर नवीन एलिव्हेटेड २+२ मार्ग बनविण्यात येणार आहे. त्यामुळे वर-खाली ४+४ असे एकूण ८ लेनच्या मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत.
२. टोल नाक्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३+३ अस्तित्वात असलेल्या मार्गिका ६+६ करण्यात येणार आहे.
३. संपूर्ण प्रकल्प बीओटी तत्त्वावर असणार आहे. या रस्त्याची लांबी ४ कि. मी. असणार आहे.
वर्सोवा पुलाच्या कामाला गती मिळाली – खासदार राजन विचारे
राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील वर्सोवा येथील धोकादायक झालेल्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून त्याठिकाणी ९७० मी. लांबीचा ४ लेन असलेल्या नवीन पुलाचे काम संत गतीने सुरु असल्याने खासदार राजन विचारे यांनी आज पाहणी करून त्यामधील अडथळे दूर करून त्या कामाला गती दिली.
या वर्सोवा पुलाच्या कामाचे ११ जानेवारी २०१८ रोजी भूमिपूजन होऊन सुद्धा या कामास सुरुवात करण्यात आली नव्हती. त्यासाठी वन खात्याची परवानग्या मिळवून घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन व संसदेत सतत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार सुरु होता. त्यामुळेच २९ एप्रिल २०१९ रोजी वन खात्याच्या अंतिम परवानग्या प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु कोरोनाच्या महामारी व मजुरांच्या अपुऱ्या तुटवड्यामुळे हे काम २०२२ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
या मार्गावरून (पी सी यु) पॅसेंजर कार युनिट च्या अहवालानुसार या मार्गावरून दररोज सव्वा लाख गाड्या ये-जा करीत आहेत. त्यामुळे या प्रकल्पामधील २ अंडरपास फाउंटन चौकामध्ये असल्याने त्याचे काम सुरु करण्यासाठी वाहतुकीचे नियोजन व परवानगी आवश्यक असल्याने खासदार राजन विचारे यांनी उपस्थित असलेले पोलीस आयुक्त सदानंद दाते व वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमित काळे यांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या तातडीने देण्याची विनंती करण्यात आली. व त्यावर त्यांनी या परवानग्या १५ दिवसात देऊ असे आश्वासन दिले.

 447 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.