वयाच्या ८४ व्या वर्षी घेतली जीवनाच्या रंगमंचावरुन एक्झिट
ठाणे : ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं वृद्धापकाळाने निधन झालं असून ते ८४ वर्षांचे होते. ठाण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रवी पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये काल केलं आहे. ‘अगंबाई सासूबाई’ ही रवी पटवर्धन यांची शेवटची मालिका ठरली.
वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी १९४४ साली एका नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात काम केलं होतं. या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष हे बालगंधर्व होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. आरण्यक हे नाटक रवी पटवर्धन यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केलं. त्यामध्ये त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर अगदी वयाच्या ८२ व्या वर्षातही या नाटकात ते तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते.
सध्या ते झी मराठीवरील ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेतील आशुतोष पत्की म्हणजेच, सोहमच्या आजोबांची भूमिका साकारत होते. फार कमी वेळातच रवी पटवर्धन यांनी साकरलेल्या या मालिकेतील आजोबांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. लाडावलेल्या सोहमला धाकात ठेवणारे आजोबा… आणि नातवाला ‘सोम्या… कोंबडीच्या’ असं म्हणणारे ‘दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी’ या भूमिकेतील रवी पटवर्ध यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं.
त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे
‘आरण्यक’मधील धृतराष्ट्र, पुलंच्या अजरामर ‘तुजं आहे तुजपाशी’मधील दिलखुलास काकासाहेब यांसारख्या अनेक संस्मरणीय भूमिका साकारणारे, वयाच्या ८२व्या वर्षीही रंगभूमीवर तितक्याच ताकदीने उभे राहणारे, अस्सल ठाणेकर रवी पटवर्धन यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!
एकनाथ शिंदे, नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि पालकमंत्री, ठाणे व गडचिरोली
सामाजिक कामात ही पटवर्धनांचा पुढाकार होता
दूरदर्शनवरील आमची माती आमची माणसं, गप्पा गोष्टी अशा विविध कार्यक्रमातून तसेच हिंदी, मराठी चित्रपटातुन व रंगभूमीवर, मालिकेतून रवी पटवर्धन यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षक वर्गाला आपलंस केले होते. पन्नास वर्षे एक कलावंत म्हणून सतत कार्यरत होते शिवाय सामाजिक कामात ही त्यांचा पुढाकार होता. माझी आणि त्यांची जेव्हा भेट होई त्यावेळी विविध विषयांवर त्यांच्या सोबत मनमोकळे पणाने गप्पा होत असत. ठाणेकरांवर नेहमी त्यांनी प्रेम केले आहे. शिवाय ठाणेकर नागरिकांनीही पटवर्धन यांना भरभरून प्रेम दिले. रवी पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
आमदार संजय केळकर
अभिनय संपन्न कलावंतांला श्रध्दांजली!
मराठी रंगभूमीसह, आपल्या अभिनयाने चित्रपट सृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ८३ वर्षां पर्यंत ते कार्यरत होते… त्यांच्या निधनाने ठाणेकर एका संवेदनशील अभिनेत्याला मुकले आहे.
भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
बालगंधर्व हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयाच्या रवी पटवर्धनांनी भूमिका केली होती.आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते. वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला व त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला व त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला. मी सांस्कृतिक कार्यक्रमा निमित्ताने त्यांना अनेकदा भेटलो होतो त्या़चा आणि माझा वैयक्तिक स्नेह होता. सांस्कृतिक ठाणे शहराच्या जडणघडणीत त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे अशा बहुआयामी कलावंतांला तमाम ठाणेकरांच्यावतीने भावपुर्ण श्रध्दांजली!
*नरेश गणपत म्हस्के*
*महापौर, ठाणे*
491 total views, 1 views today