शानू पठाण यांच्या आंदोलनाला आठवडाभरातच यश

मुंब्रा-कौसा येथील सीसीटीव्ही कार्यान्वित

ठाणे : मुंब्रा-कौसा भागातील सीसीटीव्ही बंद असल्याच्या निषेधार्थ गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कळवा- मुंब्रा अध्यक्ष शानू पठाण यांनी आंदोलन केले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून मुंब्रा भागातील ९० टक्के सीसीटीव्ही सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, महिला संघटनेने १४६ कॅमेरे स्वखर्चाने दिले असून १४९ ठामपाने लावले आहेत. पण, सद्यस्थितीमध्ये ३०० कॅमेरे दिसत नसल्याने सीसीटीव्ही घोटाळा झाल्याची शक्यता असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी शानू पठाण यांनी केली आहे.
मुंब्रा -कौसा भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याच्या निषेधार्थ शानू पठाण यांनी गत मंगळवारी (दि.१ डिसेंबर) आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर त्यांनी विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. या भेटीमध्ये संबधित अधिकार्‍यांनी हे कॅमेरे कोणी लावले आहेत हे माहित नसल्याचा दावा केला. अशा पद्धतीचे उत्तर मिळाल्याने शानू पठाण यांनी आयुक्तांना पत्र लिहून हे सीसीटीव्ही कॅमेरे समजाकंटकांकडून लावण्यात आले असावेत. या कॅमेर्‍यांमधील फुटेजचा वापर गैरकृत्यांसाठी होऊ शकतो. त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी; तसेच, विद्युत विभागाच्या मालकीच्या खांबांवर झालेले कृत्य जर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना माहित नसेल तर त्यांनाही निलंबित करावे, अशी मागणी केली होती.
या मागणीनंतर विद्युत विभागाचे अधिकारी तत्काळ कामाला लागले. त्यांनी सीसीटीव्हीची जबाबदारी घेऊन सर्व कॅमेरे सुरु करण्याची कार्यवाही केली. तसेच, आज हाजुरी येेथील विद्युत विभागाच्या कार्यालयात शानू पठाण यांच्याशी चर्चा करुन उर्वरित सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्यात येतील, असे सांगितले.
दरम्यान, पठाण यांनी सीसीटीव्ही कॅमेरे सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून नगरसेवकनिधीमधून उभारलेल्या सीसीटीव्हींचा तपशील तत्काळ नगरसेवकांना द्यावा; जर, ३०० कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ३०० केॅमेरे दिसून येत नाहीत. त्यामुळे त्याची चौकशी करण्यात यावी; ठाणेकरांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या कॅमेर्‍यांचा बॅकअप केवळ एका आठवड्याचा आहे. तो एक महिन्याचा करावा आणि त्यांचे साठवणूक केंद्र प्रभाग समितीनिहाय करण्यात यावे; मुंब्रा-कौसा, दिवा येथील ४९ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे साठवणूक केंद्र अर्थात मुख्य केंद्र दिवा आणि मुंब्रा प्रभाग समितीमध्ये विभागवार करावे, अशी मागणी केली आहे.

 461 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.