तर लोकसहभागातून ठाणेकरांसाठी ट्रक टर्मिनस उभारू


आमदार संजय केळकर यांनी वाहतूक कोंडीविरोधात थोपटले दंड

ठाणे : मॉडेला नाक्याजवळील भूखंडावर ट्रक टर्मिनस ठाणे महापालिकेने लवकर उभारले नाही तर लोकसहभागातून ते उभारू, असा इशारा ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान त्यांनी वाहतूक पोलीस अधिका-यांची बैठक घेऊन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक सूचना केल्या.
शहरात मेट्रोसह अन्य कामे सुरु असल्याने रस्ते अरुंद झाले असून त्यात दुतर्फा उभ्या वाहनांनी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्याचा नाहक त्रास ठाणेकरांना होत आहे. या समस्येबाबत संजय केळकर सातत्याने पाठपुरावा करत असून त्यांनी ठाणे महापालिकेला ट्रक टर्मिनस संदर्भात पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे. मॉडेला नाक्याजवळील भूखंड ट्रक टर्मिनससाठी उपलब्ध असल्याचे पत्र प्रशासनाने केळकर यांना चार वर्षांपूर्वी दिले आहे. असे असतानाही तेथे ट्रक टर्मिनस अद्याप का उभारले नाही, असा प्रश्न केळकर यांनी प्रशासन आणि सत्ताधा-यांना विचारला आहे. ट्रक टर्मिनसऐवजी ‘भूखंडाचे श्रीखंड’करु नका, असा टोलाही त्यांनी हाणला आहे. या भूखंडावर सुमारे ५०० वाहनांची सोय होणार आहे. वाहतूक कोंडी आणि अवैध पार्किंग टाळण्यासाठी या वाहनतळाचा खुप उपयोग होणार आहे. याबाबत तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याबरोबर वेळोवेळी बैठका झाल्या होत्या, पण अजूनही ठोस कारवाई न झाल्याने ही सुविधा रद्द होते की काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या भूखंडावर कोणाचा डोळा असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवू, पालिका वाहनतळ उभारत नसेल तर वेळ पडल्यास लोकसहभागातून ट्रक टर्मिनस उभारू, असा इशाराही केळकर यांनी दिला आहे.
कामांना गती द्या, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करा
ठाणे शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत कामांना गती, नवीन वाहनतळ, गतीरोधक आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी यांच्या समवेत संजय केळकर यांनी बैठक घेतली.
मीनाताई ठाकरे चौक येथील उड्डाणपूल दुतर्फा वाहतुकीसाठी त्वरित खुला करावा, अशी सूचना त्यांनी केली. मासुंदा तलाव सुशोभीकरण, गावदेवी वाहनतळ, वॉटर फ्रंटची कामे, स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या सर्व कामांचा आढावा यावेळी केळकर यांनी घेतला.
रेल्वे  स्थानक परिसरातील वाहतुकीचे योग्य नियोजन होण्यासाठी सेटीसवर रिक्षाथांबा करणेबाबत चर्चा करण्यात आली. प्रभात टॉकिज आणि रंगायतनजवळील जागा तसेच नौपाडा पोलीस स्थानकासमोरील आरक्षित जागा वाहनतळांसाठी घेऊन तेथे वाहनतळे उभारावीत यासाठी केळकर हे गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करत असून त्याबाबत कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी करुन बेशिस्त आणि अरेरावी करणा-या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली.

 446 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.