शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर प्रकल्प मुदतीआधी पूर्ण करणार

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : एमएमआर प्रदेशातील वाहतुकीला गती देण्याबरोबरच या संपूर्ण क्षेत्राला जवळ आणण्यासाठी महत्त्वाचा असलेला, देशातील सर्वाधिक लांबीचा, शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर प्रकल्प मुदतीपूर्वी, म्हणजे सप्टेंबर २०२२ पूर्वीच पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर कमी करण्याबरोबरच वाहतूककोंडीतूनही मोठा दिलासा मिळेल, असे शिंदे म्हणाले.
शिंदे यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी केली. १०० वर्षे टिकेल अशा पद्धतीने या पुलाची बांधणी करण्यात येत असून ३ + ३ लेनच्या, २२ किमी लांबीच्या या सागरी मार्गाचे जवळपास ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १७ हजार कोटींचा हा प्रकल्प असून वित्त पुरवठ्यासाठी जायका समवेत करार झाला असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली. मुंबईहून पुणे, गोवा, अलिबाग तसेच प्रगतीपथावर असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जलदगतीने जाण्यासाठी या ट्रान्सहार्बर लिंकचा उपयोग होणार असून मुंबईकडील बाजूने तो कोस्टल रोडलाही जोडण्यात येणार आहे. त्यासाठी एमएमआरडीए शिवडी-वरळी कनेक्टर प्रकल्पही स्वतंत्ररित्या राबवत असून त्या कामाचा कार्यादेशही लवकरच देण्यात येणार आहे.
तीन पॅकेजमध्ये ट्रान्सहार्बर प्रकल्पाचे काम सुरू असून पॅकेज १ एलअँडटी व आयएचआय कंसोर्शिअम, पॅकेज २ देऊ ईअँडसी व टाटा प्रोजेक्ट्स जेव्ही आणि पॅकेज ३ एलअँडटी करत आहेत. करोना काळातही कामाच्या गतीवर परिणाम होऊ दिलेला नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज आणि एलअँडटी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

 327 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.