एफ कॅबीन रस्ता काँक्रीटीकरणाच्या श्रेयावरून शिवसेना भाजपा आमने सामने

एकाच रस्त्याचं भाजप आणि शिवसेनेकडून उद्घाटन

कल्याण : एफ कॅबीन रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून हा रस्ता आजपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र या रस्त्याच्या कामावरून शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमने सामने आले असून या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपा या दोघांनीही एकाच रस्त्याचे उद्घाटन केले आहे. यामुळे ऐन थंडीत देखील कल्याण डोंबिवलीत राजकारण चांगलेच तापले आहे.
कल्याण-पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा धर्मवीर आनंद दिघे पुलाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे आणि एफ कॅबीन रोड ते आंबेडकर चौक वालधुनी पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेकडून करण्यात आले. एमएमआरडीएच्या चार कोटी ३५ लाख निधीतून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जवळपास एक महिना हा रस्ता बंद असल्याने नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागला अखेर रस्त्याचे काम झाले. आता या रस्त्याचा श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप आमने सामने आले आहेत.
आज सकाळी ९ वाजता परिवहन सभापती मनोज चौधरी, शिवसेनेचे धनंजय बोडारे, नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक रमेश जाधव, माजी नगरसेवक शरद पाटील, हर्षवर्धन पालांडे आदींच्या हस्ते रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं. माजी नगरसेवक शरद पाटील यांनी रस्त्याच्या कामासाठी पालक मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त यांना धन्यवाद दिले आहे. कामाचं श्रेय आता कोणालाही घेऊ द्या. लोकांना माहिती आहे काम कोणी केलं आहे. पालकमंत्र्यांचे आदेशानंतर आज आम्ही रस्त्याचे उद्घाटन केले आहे. या रस्त्याच्या उद्घाटनानंतर नागरिकांच्या त्रास आता कमी होणार असल्याचे शरद पाटील यांनी यावेळी सांगतिले.
तर शिवसेनेच्या कार्यक्रमानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले, की हा रस्ता माझ्या पाठपुराव्याने आणि भाजपचे सरकार असताना निधी मंजूर करण्यात आला होता. आम्ही उद्घाटन करणार होतो, त्यापूर्वी काही लोकांनी उद्घाटन केले. खरं दाखवा निधी तुम्ही आणला का?, असा सवाल उपस्थित करत कोणाच्याही बापाला आपला बाप बोलायचे आणि नारळ फोडायचे अशी घणाघाती टीका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे.
दरम्यान आजच्या या रस्त्याच्या श्रेयवादामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील  राजकारण चांगलंच तापले आहे.

 287 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.