देशात डिजीटल कॉमर्स राबवण्यात ई कॉमर्स कंपन्यांचा अडथळा

कॉंफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

ठाणे : देशातील बड्या इ कॉमर्स कंपन्या सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे रिटेल व्यापाऱ्यांना ऑनलाईन व्यापार करण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात व्यापाऱ्यांची पालक संघटना असलेल्या कॉंफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. ” देशातील रिटेल व्यापारी ई कॉमर्स व्यापार करण्यास तयार आहेत. पण बड्या ई कॉमर्स कंपन्या उघडपणे एफडीआयचे कायदे आणि नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना डिजिटल कॉमर्सचा अवलंब करण्यात अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार या पत्रात केली आहे” असे कॉंफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स चे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी संगितले.
सुरेशभाई ठक्कर म्हणाले, देशातील उद्योग वाढावेत म्हणून लोकल फॉर व्होकल आणि आत्मनिर्भर भारत या दोन महत्वपूर्ण अभियानांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. हे दोन्ही अभियान यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हापातळीवर व्यापारी, ग्राहक, उत्पादकांचे प्रतिनिधी आणि शासकिय अधिकारी यांचा समावेश असलेल्या संयुक्त समित्या निर्माण कराव्यात. याशिवाय एफडीआयचे कायदे धाब्यावर बसवून व्यापार करणाऱ्या ई कॉमर्स कंपन्यांवर थातुरमातुर कारवाई न करता त्यांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रविण खंडेलवाल म्हणाले, रिटेल व्यापारासंदर्भात देशात वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहेत. पण दुदैवाने शासनाच्या विविध खाते विभागांना त्यांची प्रभावी अंमलबजावणी करता आली नाही. देशात ई कॉमर्सला बढावा मिळावा म्हणून एक धोरण तयार करावे. या ई कॉमर्स व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापक अधिकार असणारी समिती नेमावी. असे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकल फॉर व्होकल आणि आत्मनिर्भर भारत हे अभियान देशातील व्यापाऱ्यांसाठी खूपच निर्णायक ठरु शकते. यामाध्यमातून उच्च दर्जाचे उत्पादन करण्यासाठी छोट्या उत्पादकांची विकास क्षमता वाढू शकते. त्यामुळे हे अभियान देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याची आवश्यकता असल्याचे भरतीया आणि खंडेलवाल यांनी सांगितले.

 390 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.