ठाण्यात राबवणार कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहिम

ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने होणार हा उपक्रम

ठाणे : क्षयरोग व कुष्ठरोग या गंभीर सामाजिक आरोग्य समस्येचे समूळ उच्चाटन करणेसाठी ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने ”संयुक्त सक्रिय क्षय व कुष्ठरुग्ण शोध मोहिम २०२०” अभियानाचे आयोजन १ ते १६ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले असून या मोहिमेमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेवून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त (१) गणेश देशमुख यांनी केले आहे.
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. क्षयरोग व कुष्ठरोग या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ठाणे शहरात अतिजोखमीच्या ठिकाणी एकूण ४२० टीम शहरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याची क्षयरोग व कुष्ठरोग या आजाराची तपासणी करणार आहेत. तसेच या रोगाबाबतच्या लक्षणांची माहिती देखील टीममार्फत देण्यात येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील ६ लक्ष इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार असून आजारांचे लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची मोफत एक्सरे, थुंकी तपासणी, सीबीनेट तपासणी जवळच्या सरकारी दवाखन्यात करुन रोगाचे निदान झाल्यास त्यांना त्वरीत मोफत औषधोपचार चालू करण्यात येणार आहेत.
या शोध मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व स्वयंसेविका संस्थांचे स्वयंसेवक यांचे गट तयार करण्यात आले आहेत. त्या गटामार्फत घरोघरी भेट देवून क्षयरोग व कुष्ठरोग संबंधी पूर्ण माहिती व योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 342 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.