अवकाळी पाऊस, कोरोनामुळे मुक्त विद्यापीठातर्फे प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सवलत
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेताना प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सुविधा आणि प्रवेशाच्या मुदतीतही वाढ करण्यात आल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी दिली. राज्यभरात अनेक ठिकाणी झालेला अवकाळी पाऊस आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी सांगितले. प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सुविधा मंगळवार ३ नोव्हेंबरपासून उपलब्ध करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांसाठीचे चालू शैक्षणिक प्रवेश कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विलंबाने सुरु झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यातच गेल्या महिन्यात सर्वत्र अवकाळी पावसाने घातलेले थैमान, यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेता आले नाहीत. अनेक भागात पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. पाऊस आणि कोरोना महामारी यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा एक प्रयत्न आणि पुरेशा शुल्काअभावी त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये किंवा शिक्षणापासून ते वंचित राहू नयेत, म्हणून आता ३ नोव्हेंबरपासून प्रवेश घेणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना दोन टप्प्यात प्रवेश शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना लगेचच संपूर्ण शुल्क ऑनलाईन भरण्याची गरज नाही. एकूण शुल्कापैकी पन्नास टक्के शुल्क भरून त्यांना हव्या असलेल्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. उरलेले पन्नास टक्के शुल्क दुसऱ्या टप्प्यात विद्यापीठाने दिलेल्या मुदतीत भरता येईल. यासोबतच प्रवेश घेण्याची मुदतही सध्या १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली असून, या सुविधेचा अवश्य लाभ घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांना प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वातीने करण्यात आले आहे.
476 total views, 2 views today