राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांची पालिका आयुक्तांकडे मागणी रुग्णसंख्या कमी होत असताना २३ कोटींचा खर्च निरर्थक असल्याचे व्यक्त केले मत
ठाणे : ठाणे शहरांतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून रुग्णांवर उपचारांसाठी शहरांत असलेल्या केंद्रातील जवळपास ८० टक्के बेड रिक्त आहेत. त्यामुळे सीडकोच्या तिजोरीतले २३ कोटी रुपये खर्च करून व्होल्टास कंपनीवरील जागेत वादग्रस्त ठरलेले नवीन कोविड सेंटर उभारण्याची तूर्त गरज नाही. व्यापक हित लक्षात घेता या कामाला स्थगिती देऊन कोट्यवधी रुपयांचा अपव्यय थांबवावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त डाँ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
ठाणे शहरांत कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी उपलब्ध असलेले बेड, तिथे उपचार घेत असलेले रुग्ण आणि शहरांत कोरोना बाधितांची झपाट्याने कमी होत असलेली संख्या याचा वातवदर्शी आढावा घेत आपली मागणी योग्य असल्याचे मुल्ला यांनी निवेदनात पटवून दिले आहे. ठाणे शहरांत कोरोना रुग्णांसाठी ४ हजार ३८३ सर्वसाधारण श्रेणीतले (जनरल वाँर्ड) बेड उपलब्ध आहेत. २९ आँक्टोबर रोजी त्यापैकी फक्त ८६१ बेडवर रुग्ण उपचार घेत होते. तब्बल ३ हजार ५२३ बेड म्हणजेच ८० टक्के बेड रिकामे होते. त्यापैकी १७८० बेडवर आँक्सिजनची सुविधा आहे. मात्र, त्यापैकी १५०५ म्हणजेच ८५ टक्के बेडवर रुग्णच नव्हते. आयसीयू बेडची संख्या ४६८ असून तिथे जेमतेम २४३ रुग्ण उपचार होते. त्यामुळे तिथलेही २२५ बेड रिक्तच होते. अत्यवस्थ रुग्णांसाठी व्हेन्टिलेटर्सची सुविधा असलेले १९३ बेड आहेत. मात्र, अशा गंभीर रुग्णंची संख्या कमी असल्याने ५५ टक्के म्हणजेच १०६ बेडवर रुग्ण नव्हते. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सज्ज असलेल्या केंद्रातील ८० टक्के बेडवर जर रुग्णच नसतील तर २३ कोटी रुपये खर्च करून नव्या कोविड सेंटरची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
२० कोटी रुपये खर्च करून ज्युपिटर हाँस्पिटल जवळच्या पार्किंग प्लाझा येथे कोविंड सेंटर उभारले जात आहे. आँक्सिजनची गरज असलेल्या अत्यवस्थ रुग्णांवरील उपचारांची सोय केली जाणार आहे. त्यामुळे व्होल्टास येथील आणखी एक केंद्राची गरज नाही. रुग्णसंख्या कमी होत असल्याने मुंबईतील केंद्र टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे नियोजन होत आहे. त्यामुळे ठाण्यात आणखी एका केंद्राची भर टाकणे हे सर्वार्थाने चुकीचे असल्याचे मुल्ला यांचे म्हणणे आहे. ठाणे शहरांतील कोरोना रुग्णांच्या संख्येत भविष्यात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. परंतु, दुर्देवाने ती झाली आणि या केंद्राची गरज भासली तर त्या परिस्थितीत केंद्र उभारणीचा पर्याय पालिकेने खुला ठेवावा असेही मुल्ला यांनी पत्रात नमूद केले आहे.
परिस्थिती कठिण ; पैशांचा अपव्यय नको
कोरोना संक्रमणामुळे केवळ आरोग्यच नाही तर सरकारी यंत्रणांची आर्थिक घडीसुध्दा विस्कटली आहे. त्याचे चटके येत्या काळात आपल्याला सोसावे लागणार आहेत. त्यामुळे पैसा पालिकेचा आहे, राज्य सरकारचा आहे की एमएमआरडीए- सीडको सारख्या प्राधिकरणांचा यांचा विचार न करता त्याची बतच करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. खर्च करताना कामांचा प्राधान्यक्रम आणि निकड ठरविणे ही काळाची गरज असल्याचेही मुल्ला यांनी नमूद केले आहे.
तर पालिकेला टिकेचे धनी व्हावे लागेल
या केंद्राच्या कामावर सातत्याने टीका होत आहे. कामाची निविदा प्रसिध्द करण्यापूर्वीच कंत्राटदार ठरल्याचा आरोप आहे. निविदा भरण्याच्या दिवशी अटींमध्ये झालेला बदल आणि नव्या अटींच्या पूर्ततेसाठी दिलेला फक्त सात दिवसांचा कालावधी वादग्रस्त ठरला होता. अंदाजखर्च १२ कोटींचा आणि प्रत्यक्ष काम २३ कोटींना मंजूर करण्याची पालिकेची भूमिका संशयास्पद आहे. या केंद्राच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा काही लोकप्रतिनिधी आणि ठाण्यातील जागरूक नागरीकांनी दिलेला आहे. त्यामुळे तूर्त गरज नसताना या केंद्राच्या उभारणीसाठी लगबग केली तर २३ कोटी रुपयांचा अपव्यय होईल आणि पालिकेला भविष्यात टीकेचे धनी व्हावे लागेल अशा सावधानतेचा इशाराही मुल्ला यांनी दिला आहे.
आयुक्तांच्या कार्यशैलीचे कौतूक
कोरोना संक्रमण वेगाने फैलावत असताना पालिका आयुक्त पदाचा पदभार विपीन शर्मा यांनी स्वीकारला. त्यानंतर ठोस नियोजन करून शहरांतील कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवले आणि रुग्णसंख्या कमी करण्यात यश प्राप्त केले. या कामांमुळेच ठाणेकरांची चिंतामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे अशा शब्दात मुल्ला यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीचे कौतूक केले आहे.
514 total views, 1 views today