उर्जस्वी नवदुर्गा समाजाच्या खऱ्या दीपस्तंभ – आ. निरंजन डावखरे

विविध क्षेत्रातील ठाण्याच्या नवदूर्गांचा भाजपतर्फे सन्मान

ठाणे : कोरोना काळात स्वतःचे कुटुंब संभाळुन कर्तव्य बजावणाऱ्या महिलांमुळे समाजाला प्रेरणा मिळते.विविध क्षेत्रातील अशा उर्जस्वी नवदुर्गा समाजाच्या खऱ्या दीपस्तंभ आहेत.असे गौरवोदगार भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी काढले.नवरात्रौत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी,ठाणे पूर्व यांच्यावतीने कोरोना काळात अविरत सेवा बजावणाऱ्या नऊ कोविड योद्धया महिलांचा यथोचित गौरव गुरूवारी ठाणे पुर्वेकडील आनंद बॅन्क्वेट हॉलमध्ये करण्यात आला.त्यावेळी डावखरे बोलत होते.भाजप कार्यकर्ते कृष्णा भुजबळ यांनी आयोजीत केलेल्या या कार्यक्रमाला आ.संजय केळकर,भाजपा प्रदेश सचिव संदिप लेले,स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, कैलास म्हात्रे, सचिन कुटे आणि शेखर निकम आदी उपस्थित होते.झोकून देऊन काम करण्याची उर्जा असल्याने शहराच्या विकासातदेखील महिलांचे विशेष योगदान असल्याचे केळकर म्हणाले.
कोरोनावर मात करण्यासाठी गेले काही महिने विविध क्षेत्रातील महिला अविरत झटत आहेत. त्याचबरोबर,अनेकजणी सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत राहुन समाजाचे ऋण फेडत आहेत.तेव्हा, नवरात्रौत्सवाचे औचित्य साधुन भारतीय जनता पार्टी,कोपरी ठाणे यांच्यावतीने विविध क्षेत्रातील नऊ नवदुर्गाचा सन्मानसोहळा गुरुवारी पार पडला.यात कोरोनाशी दोन हात करून या आजारावर मात करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकारी सहा.आयुक्त प्रणाली घोंगे, कोरोनाबाधित झाल्यानंतरही सेवा बजावणाऱ्या किंबहुना, प्लाझ्मादान करून कोविडग्रस्त रुग्णाचे प्राण वाचवणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक दिपाली लंभाते,स्वच्छता निरिक्षक चारू घुटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री कुलकर्णी,गर्दीतही प्रवाश्यांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या टीएमटीच्या तेजस्विनी वाहक उज्वला शेलार,आशा वर्कर सीमा सुर्यवंशी,कोविड रुग्णांसोबत कुटुंबियांच्या सुश्रुषेसाठी घरोघरी भेट देणाऱ्या परिचारिका विजया यादव,चतुरस्त्र पत्रकारिता करणाऱ्या धडाडीच्या पत्रकार अनुपमा गुंडे आणि शिक्षण क्षेत्रातील अग्रणी तथा ठाण्याच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ महिला ८० वर्षीय माजी नगरसेविका विणा भाटीया आदी नवदुर्गांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.या नवदुर्गानी कोरोना काळात आपआपल्या स्तरावर स्वकतृत्वाने नागरिकांमध्ये कार्यरत राहून कर्तव्य बजावल्याने भाजपच्यावतीने या नऊ जणींचा नवदुर्गा पुरस्काराने हृदय सत्कार करण्यात आल्याचे कृष्णा भुजबळ यांनी सांगितले.

 319 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.