१०० पेक्षा जास्त कापड विक्रेत्यांचा माल जप्त
ठाणे : ठाण्यातील कोपरी पूर्व येथे भरणाऱ्या जुन्या कापड मार्केटवर आज ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने धडक कारवाई करून जवळपास १०० पेक्षा जास्त अनधिकृत विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली असून यामध्ये कपडे विक्री करणारा एक टेम्पोही जप्त करण्यात आला आहे.
ठाणे पूर्वेला स्थानकापासून हाकेच्या अंतरावर अनधिकृतपणे जुन्या कपडयांचा बाजार भरला जातो. या बाजारात विक्रते व ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रेल्वे स्थानकापासून तसेच कोपरी परिसरातील ये – जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नौपाड़ा – कोपरी प्रभागात भाजी मार्केट, कापड मार्केट तसेच दुकानांमध्ये सामाजिक अंतर नियमांचा भंग केला जात असल्याने ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी काल जुन्या कापड बाजारावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने आज ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली आहे . कोपरी येथे दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत जुन्या कपड़यांचा बाजार भरला जात असून या दरम्यान साधारण एक किलोमीटर अंतरावर महिला पुरुष रांग लावून गर्दी करतात. यामुळे कोपरी येथे शांत असलेल्या परिसरात बाजारामुळे एकच कल्लोळ सुरू होतो. सध्यस्थितीत एकाच ठिकाणी गर्दी केल्याने कोरोनाच्या संसर्ग होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उप आयुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील अतिक्रमण विभागाच्यामाध्यमातून पोलीस बंदोबस्तात करण्यात आली आहे.
413 total views, 1 views today