नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या

शहापूरातील पीक पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

शहापूर (शामकांत पतंगराव): सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले भात पीक आडवे झाल्याने ठाणे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला असून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापूर तालुक्याचा दौरा केला असून तब्बल ८० टक्क्यांहून अधिक भात पिकांचे गंभीर नुकसान झाले असल्याचे सांगून येत्या दोन ते तीन दिवसांत  पिकांचे त्वरित पंचनामे करून त्यांना भरपाई मिळावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
भात पिकाला पूरक पाऊस मिळाल्याने सोन्यासारखे पिवळे धमक डौलदार भातपीक वाऱ्यावर डोलत होते,हे बघून शेतकरीराजा खूप आनंदीत झाला होता,परंतू सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे हे पीक जमीन दोस्त झाले, कापलेली भाताची रोपे पाण्यात भिजून तरंगू लागली,पेंढा काळा पडला,भाताच्या दाण्याला मोड आले हे सारे चित्र डोळ्यादेखत बघताना शेतकरीराजा मात्र कोलमडला.भातपिकाचे झालेले नुकसान पाहण्यासाठी व शेतकऱ्याला धिर देण्यासाठी आज(दि.२२)पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापूर तालुक्याचा धावता दौरा केला.
शहापूर तालुक्यात लागवड करण्यात आलेल्या १४ हजार १५५ हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ३३५ हेक्टर म्हणजे ८० टक्क्यांहून अधिक क्षेत्र बाधित झाले असून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना याआधीच सूचना दिलेल्या असून प्रत्येक शेतात कृषी व महसूल विभागा तर्फे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे पाहणी दौऱ्याच्या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचे त्यांनी सांगितले, या संकटसमयी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल याबाबत सरकार निर्णय घेईल अशी ग्वाही पालकमंत्री शिंदे यांनी दिली.
यावेळी शहापूर विधानसभा मतदार संघांचे आमदार दौलत दरोडा,माजी आमदार पांडुरंग बरोरा, भिवंडी ग्रा. चे आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे, कृषी सभापती संजय निमसे,पंचायत समितीचे व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान पालकमंत्री शिंदे यांनी तालुक्यातील फणसपाडा येथे वीज पडून जखमी झालेल्या २६ जणांची शहापूर उपजिल्हारुग्णालयात जाऊन चौकशी केली व त्यांना धीर दिला. तसेच संबंधित डॉक्टरांना लक्ष द्या अशा सूचना केल्या.

 339 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.