प्रत्यक्ष महासभा भरवण्याचा भाजपाचा आग्रह

नाहीतर तीव्र आंदोलन करणार गटनेते संजय वाघुले यांचा महापौरांना इशारा

ठाणे : महापालिकेची महासभा वेबिनारऐवजी प्रत्यक्ष न भरविल्यास भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महापालिकेतील भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी महापौर नरेश म्हस्के यांना पत्राद्वारे दिला आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विधीमंडळाचे अधिवेशनही प्रत्यक्ष पार पडले. मग महापालिकेच्या महासभा वेबिनार का, असा सवालही संजय वाघुले यांनी केला आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिकेच्या महासभा वेबिनारद्वारे आयोजित केल्या जात आहेत. त्यात गेल्या दोन महासभांवेळी गोंधळ झाला. आता वेबिनारद्वारेच तिसरी महासभाही उद्या मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी होत आहे. अशा प्रकारच्या वेबिनार महासभांना भारतीय जनता पक्षाचा तीव्र विरोध आहे. गेल्या दोन वेबिनार महासभांमध्ये भाजपच्या सर्व नगरसेवकांना अनेक विषयांवर भूमिका मांडता आलेली नाही. कोविड-१९ च्या प्रादूर्भावावर करण्यात आलेल्या उपाययोजनांवर नगरसेवकांना बोलता आलेले नाही. त्याचबरोबर आपल्या प्रभागातील विकासकामांकडेही महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधता आलेले नाही, हे ठाणेकर नागरिकांच्या दृष्टिकोनातून दुर्देवी आहे, असे महापालिकेचे गटनेते संजय वाघुले यांनी पत्रात म्हटले आहे.
कोविड'विषयीचे निर्बंध व नियमावलींचे पालन करून लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधीमंडळाचे अधिवेशन वेबिनारऐवजी प्रत्यक्ष पार पडले. या अधिवेशनानंतरकोविड’चा मोठा संसर्ग झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची महासभाही प्रत्यक्ष घेता येईल. महापालिकेच्या मालकीच्या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये ८०० व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात १२०० जणांची बैठक व्यवस्था आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगसह `कोविड’चे सर्व नियम पाळून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची सहजपणे बैठक व्यवस्था करता येईल, याकडे संजय वाघुले यांनी लक्ष वेधले. तसेच भाजपाची मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

 526 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.