चित्रपटांचे दीर्घकाळ प्रलंबित अनुदान देण्याच्या कामाला चालना देण्यासाठी अतिरिक्त समिती स्थापन करा

सिनेकलाकार लोकसाहित्य,नाट्यकर्मी यांना विमा,आरोयसेवा,प्रवास मदत करण्यास शासनाच्या विविध विभागांचे एकत्र प्रयत्न गरजेचे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई : महाराष्ट्रातील सिनेमांना अनुदाने एक वर्ष प्रलंबित असुन हे सर्व चित्रपट पाहुन त्यांच्या अनुदानाना मान्यता मिळण्यास अजुन १वर्षे लागु शकते म्हणुन यांच्या थकीत असलेल्या अनुदानाबाबत तसेच प्रलंबित असलेल्या कामाला चालना देण्यासाठी अतिरिक्त समिती स्थापन करा असे निर्देश उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांस्कृतिक विभागाला दिले.
महाराष्ट्रातील सिनेकलावंत, रंगमंच कलावंत आणि लोककला कलावंत यांचे प्रश्न चित्रपटगृहातील सुविधा व शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत आज उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थित वेबीनार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. सांस्कृतीक कार्य विभागाचे संचालक बिभिषण चौरे, सह संचालक मीनल जोगळेकर, अवर सचिव शैलेश जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, चित्रपट सेना उपाध्यक्ष दिगंबर नाईक, अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर,लोकसाहित्य अभ्यासक डॉ. चंदनशिवे, रघुवीर खेडकर, नाट्य निर्माते प्रसाद कांबळी, सुनील महाजन,मुंबई, पुणे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल , डॉ. प्रविण आष्टी कर,नाशिक, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद मनपाचे अधिकारी या वेबीनारच्या माध्यमातून सहभागी होते.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यातील प्रत्येक महानगर पालिकेतील किती नाट्यगृह आहेत, त्याची सद्य:स्थिती काय आहे, त्यापैकी छोटी नाट्यगृहे किती आहेत तसेच महानगर पालिका यासाठी कोणते सहकार्य करत आहे हे तपासावे. त्याचप्रमाणे प्रत्येक महानगर पालिकेतील नाट्यगृहाच्या स्वच्छता गृहातील नळाचे पाणी नियमीत सुरु आहे की कसे, लिकेजची अडचण आहे काय, फ्लश सुरु आहे की कसे, पिण्याच्या पाण्याची सोय कसे आहे, खिडक्यांच्या जाळ्या आणि काच दुरुस्ती केले आहे किंवा कसे, प्रत्येक स्वच्छता गृहात कचरा टोपल्या आहेत काय, फरशी दुरुस्ती केले आहे काय, स्वच्छता गृहे आणि शौचालयांना कडया आहेत काय, विद्युत व्यवस्था, बटणे व बल्ब सुरु आहेत काय, महिला कलाकारांना चेंजिंग रुम आहेत काय, हेल्प लाईन नंबर ग्रिन रुम व नाट्य गृहात लावले आहेत काय याबाबतचा आढावा घेऊन याचा अहवाल तयार करावा व तो मुख्यमंत्री व सांस्कृतीक कार्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे असेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद ,जालना येथील महानगर पालिकेतील नाट्यगृहाच्या सुविधा मधील दुरुस्तीच्या कामामध्ये सुधारणा होत आहे याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.
सांस्कृतीक कार्य विभागाचे संचालक बिभिषण चौरे म्हणाले की, राज्यातील चित्रपटगृह सिने कलावंत, रंगमंच कलावंत आणि लोककला कलावंत यांचे सर्वेक्षण चालू असून ते लवकर पुर्ण करण्यात येईल. महानगर पलिकेतील नाट्यगृहे, सिने कलावंत यांच्या अनुदानाबाबतचे काम अंतिम टप्प्‍यात असून त्यावर लवकर निर्णय होईल. कोल्हापूर चित्रनगरचे प्रस्तावीत असलेले काम चालू आहे लवकरच पूर्ण केले जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
ठाणे येथील राम गणेश गडकरी व काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या सुविधा मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. तसेच कल्याण येथील नाट्यगृह हे चौथ्या मजलावर असून कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यास त्रास होत आहे अशी सुचना अभिनेता सुबोध भावे यांनी मांडली. यावरती डॉ नीलम गोऱ्हे यांनी कल्याण येथील उद्वाहन बसविण्याबाबत मनपा कल्याण डोंबिवली यांच्या सोबत लवकरच बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी राज्यातील नाट्यगृह, सिने कलावंत, सिने नाट्यसृष्टी कलाकार तंत्रज्ञ व इतर कामगार यांना आरोग्य विमा सुविधा,आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच Film and Television Institute of India (FTII) PUNE हे नाव बदलून प्रभात फिल्म कंपनी हे नाव देणे,मराठी चित्रपटांना वरील GST माफ करणे बाबत आढावा घेतला. चित्रपट कामगारांना त्यांचे साहित्य ठेवणेसाठी गोरेगाव चित्रनगरी मध्ये छोटी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत, नवीन कलाकारांसाठी अल्प दरात मुंबईत भाडे तत्वावर निवास व्यवस्था उपलब्ध करणेबाबत, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी दुरुस्ती व व्यवस्था याबाबत मार्गदर्शक सूचना करण्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
बालगंधर्व नाट्य मंदीर पुणे व औरंगाबाद येथील संत एकनाथ नाट्यमंदिर मधील दुरूस्तीच्या कामांचे टेंडर झालेले असून कामे तात्काळ सुरू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त औरंगाबाद यांनी सांगितले.
नवीन नाट्यगृह बांधण्यासाठी व सर्व नाट्यगृहांमध्ये आवश्यक दुरूस्तीसाठी कलाकार व नाट्य निर्माता संस्थांची मदत घ्यावी, सर्व नाट्यगृहातील गैरसोईबद्दल तक्रार करण्यासाठी अधिकारी यांचे नाव व मोबाईल नंबरची यादी नाट्यगृहाच्या दर्शनी भागात लावावी, दिव्यांगासाठी सर्व मनपांनी व्यवस्था करावी असेही निर्देश डॉ गोऱ्हे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.
नाशिक मनपा यांनी कालीदास सभागृहात ताबडतोब दिव्यांगाच्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यासाठी ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिलेल्या निर्देशचे पालन करत तात्काळ रॅम्प बसविण्यात येईल तसेच कार्य अहवाल २५ ऑक्टोबर रोजी देण्यात येईल असे देखील त्यांनी नाशिक उपायुक्त यांनी सांगितले. पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुणे येथील प्रलंबित नाट्यगृहाचा कामाचा कार्य अहवाल ताबडतोब सादर केले तसेच नव्याने सुचविण्यात आलेल्या कामाचा कार्य अहवाल २५ ऑक्टोबर पर्यंत देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ठाणे मनपा येथील गडकरी नाट्यगृहाच्या प्रलंबित कामाचा अहवाल पुढील सात दिवसात सादर करण्यात येईल असे ठाणे अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले.

 282 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.