अडचणींवर एकजुटीने मात करु… सरकार तुमचे आहे

बांधावर जात शरद पवारांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर

तुळजापूर-उस्मानाबाद : हे संकट संपूर्ण शेती अर्थव्यवस्था उध्वस्त करणारं आहे. त्यामुळे तातडीची मदत कशी देता येईल… खरवडून गेलेली जमीन कशी सावरता येईल आणि नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत कशी होईल ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलो आहोत. या संकटावर… आलेल्या अडचणींवर एकजुटीने मात करु. सध्या दिवस वाईट आहेत… अडचणीचे आहेत. परंतु धीर सोडायचा नाही… यावर मात करु… सरकार तुमचं आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मराठवाडयातील अतिवृष्टीत सापडलेल्या शेतकर्‍यांना दिला.

लातूर जिल्हयातील राजेगाव येथे शरद पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

आज आणि सोमवारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मराठवाड्यातील गावांचा पाहणी दौरा करत आहेत. आज सकाळपासून शरद पवार यांनी पाहणी सुरू केली. यावेळी प्रत्येक शेतकरी आपलं गार्‍हाणं त्यांच्याशी मांडत आहे. त्यावेळी शरद पवार धीर सोडू नका आम्ही आहोत असा शब्द शेतकर्‍यांना देत आहेत.
आज दुपारी राजेगाव येथे शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना लातूर जिल्हयातील किल्लारी आणि परिसरात झालेल्या भूकंपाची आठवण सांगितली. त्याठिकाणी पहाटे पोहचुन लोकांना धीर दिला होता. संकटग्रस्त माणसांना उभं केलं होतं. आज तसंच संकट उभं ठाकल्याचं त्यांनी सांगितले.
दुष्काळ आल्यावर पीकंच नष्ट होतात, परंतु या संकटात जमीनच खरवडून गेली आहे. जमीनीचे स्वरूपच बदलले आहे त्यामुळे हे जास्त नुकसान आहे. या संकटावर मार्ग काढावा लागेल. यासाठी राज्य व केंद्र सरकारशी बोलू. नुकसानीचे स्वरूप पहाता एकंदरीत राज्य सरकारची या सगळ्याला तोंड देण्याची परिस्थिती नाहीय. मात्र यासाठी केंद्राची मदत मिळणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि देशातील प्रमुख लोकांशी बोलून तातडीची मदत कशी देता येईल असा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 460 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.