ठाण्यातील मराठी उद्योजकांच्या व्यवसायाची माहिती एका ‘क्लिक’वर

‘उद्यम ठाणे’ परिवाराच्या डिजीटल सूचीचा अनोखा उपक्रम
घटस्थापनेच्या मुहूर्तावर संकेतस्थळाचे अनावरण
ठाणे : बाबा मला नवीन लॅपटाॅप हवा…अगं आई दिवाळीचा फराळ कुठून आॅर्डर करायचा…अरे घरी पेस्ट कंट्रोल करायचे होते…या आणि अशा नानाविध प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर ‘उद्यम ठाणे’ परिवाराच्या संकेतस्थळावरील डिजीटल सूचीच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमातून मराठी उद्योजकांची मोट बांधण्यात आली आहे. शेकडो मराठी उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांना ‘उद्यम ठाणे’च्या पुढाकाराने बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर udyamthane.org या संकेतस्थळाचे  अनावरण करण्यात आले.
एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत ठाण्यात होती. मात्र नागरीकरणाच्या रेट्यात उद्योगधंदे बंद पडले. यासोबतच नव्याने विकसित होणारे ठाणे ‘चाकरमान्यांचे’ शहर म्हणून नावारूपाला आले. या शहराची हीच ओळख पुसून उद्योगांचे माहेरघर करून शहराला उद्योजकतेच्या वाटेवर नेण्याचा ‘उद्यम ठाणे’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न मागील वर्षीपासून काही नवउद्योजक व होतकरु तरुणांनी सुरु केला. यंदा २०२० वर्षाचा लेखाजोखा मांडताना पारंपरिक दिनदर्शिकेची चौकट मोडून ‘उद्यम ठाणे’ या संस्थेने ठाण्यातील १२ यशस्वी उद्योजकांची यशोगाथा ‘उद्यम ठाणे’ या दिनदर्शिकेतून समोर आणली होती. यंदा प्रथमच केलेल्या या प्रयत्नांतून ‘उद्यम’ने साकारलेल्या दिनदर्शिकेत विविध क्षेत्रातील उद्योजकांचा प्रवास ठाणेकरांसमोर आणल्याने सोशल मिडीयावर या उपक्रमाची चर्चा रंगली. त्याही पुढे जात ‘उद्यम ठाणे’ने घटस्थापनेच्या मुहुर्तावर संकेतस्थळाचे अनावरण खारकर आळी येथील सीकेपी सभागृहात करण्यात आले. यावेळी ठाण्याच्या इतिहासातील मराठी उद्योजकांची पहिलीच डिजीटल सूची मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर व सीकेपी चेंबर आॅफ काॅमर्स अँड इंडस्टीचे अध्यक्ष समीर गुप्ते यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. या सोहळ्याला कोरोना काळातील सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मोजक्या उद्योजकांनी हजेरी नोंदवली.
कोणताही व्यवसाय छोटा नाही…
तुम्ही व्यावसायिक बनलात. हीच गोष्ट फार मोठी आहे. कोणताही व्यवसाय छोटा नसतो. उद्योजकांनी हा समज मनात काढून टाकला पाहिजे. ‘उद्यम ठाणे’च्या रुपाने या मराठी उद्योजकांना जागतिक बाजारपेठेची कवाडं खुली करुन देण्यात आली आहे.
– समीर गुप्ते, अध्यक्ष, सीकेपी चेंबर आॅफ काॅमर्स अँड इंडस्टी
यशस्वी उद्योजक होण्याची संधी…
उद्यम ठाणे चळवळीतून मराठी माणसाला यशस्वी उद्योजक होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रयत्न करत रहा. निश्चितच त्याचे फळ मिळेल. उद्यम ठाणे या शहरातील जडणघडीत मोलाचे योगदान देईल. वेगळ्या वाटा शोधून उद्यमशील व्हा.
– विद्याधर वालावलकर, अध्यक्ष, मराठी ग्रंथ संग्रहालय
नोंदणी करा…मराठी उद्योजकांना पाठबळ द्या!
udyamthane.org संकेतस्थळाला भेट देऊन मराठी उद्योजकांच्या डिजीटल सुचीवर क्लिक केल्यास निश्चित मराठी उद्योजकांच्या चळवळीला पाठबळ मिळेल. तसेच रोजच्या जीवनातील शेकडो वस्तू, सेवा, खाद्यपदार्थ सर्व एका क्लिकवर ‘उद्यम ठाणे’वर उपलब्ध होणार आहेत.

 358 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.