पनवेल पोलिसांच्या मदतीने भिवंडीतील मुस्लिम तरुणी सुखरूपपणे आईच्या कुशीत विसावली!

आई ओरडली म्हणून रागाच्या भरात घर सोडलेल्या तरुणीला पनवेलकरांचा मायेचा हात!

पनवेल: रायगडातील रोहे ते उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेमुळे देश हादरला आहे. वयात आलेली तरुणी उंबरठा ओलांडून एकटीदुकटी घराबाहेर पडली तर ती सुखरूप घरी येईपर्यंत श्वास रोखून धरावा लागत आहे. पण पनवेलकरांनी सुसंस्कृतपणा दाखवून पोलिसांच्या मदतीने वाट चुकलेल्या तरुणीला तिच्या आई-वडिलांच्या हवाली केले आहे.
आई ओरडली म्हणून मनावर आघात झाल्याचा राग धरून भिवंडीतील पंधरा वर्षांची तरुणी पनवेलमध्ये आली. सकाळी बाहेर पडली आणि दुपारपर्यंत ती मिडलक्लास सोसायटीच्या मैदानाजवळ निरभ्र आकाशाच्या खाली फेरफटका मारत होती.
भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजय गुरुजी, राजू गुरुजी आणि सहकाऱ्यांना तिच्या भेदरलेल्या मनःस्थितीचा अंदाज आला. तिची विचारपूस केली. बिस्किट, पाणी दिले. तिलाही यांच्या माणुसकीवर विश्वास बसल्याने रडवेल्या स्वरात तीने मन मोकळे केले.
त्यांनी तरुणीला समजावून सांगितले. बाहेरच्या परिस्थितीबद्दल तिला जाणीव करून दिली. रिक्षा बोलावली. पोलिस ठाण्यात घेऊन गेले. या दरम्यान गुरुजी यांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्याशी संपर्क साधून संबंधित घटनेची माहिती देत सहकार्य करण्यास सांगितले.
शहर पोलिसांनी तिच्याकडून माहिती घेतली. भिवंडीतील पोलिस ठाण्यात फोन करून ही माहिती दिली. तेथील पोलिस कर्मचाऱ्याला तिच्या घरच्या पत्त्यावर पाठवले. भिवंडी पोलिसांनीही चोख कर्तव्य बजावले. तात्काळ मुलीची आई आणि भाऊ पनवेल पोलिस ठाण्यात आले. मुलीची आईची नजरानजर झाली… एका क्षणात राग विसरून एकमेकींना बिलगून भावनांना मोकळी वाट करून दिली, शहर पोलिसांच्या साक्षीने.
पोलिस उपनिरीक्षक शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी खुप महत्वाचे काम केले. ही माहिती संध्याकाळी संजय गुरुजी यांना कळविली. त्यांनी महत्वाची भूमिका वठवली होती. तर ते म्हणाले, तुमच्यामुळे यंत्रणा गतिमान झाली आणि आई-मुलीची गाठ पडली.

 434 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.