कोण ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय?

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची चौकशीची मागणी

मुंबई : मुंबईसह एमएमआरमध्ये खंडित झालेला वीज पुरवठा हा घातपाताचा प्रकार असून ऊर्जा खात्याला काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे वारंवार ऊर्जा मंत्रीच स्वतः सांगत आहेत तर मग कोण या खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करते आहे?असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी तपास यंत्रणामार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
आमदार अँड आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित करीत लिहील्या पत्रात म्हटले आहे की, अचानक मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबईसह पालघर पर्यंतच्या भागाचा वीज पुरवठा अचानक पुर्णत: खंडित झाल्याने एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थी, प्रवासी, रूग्ण यांच्यासह नागरिकांचे अतोनात हाल झाले. तसेच मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीच्या सर्व सेवा अचानक कोलमडल्याने याबाबत सर्वदूर बदनामी तर झालीच तसेच मोठे नुकसान ही झाले. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून या घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित झाले असून त्याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. सरकारने त्याची उत्तरे दिलेली नाहीत. हा प्रकार घातपात असवा असा संशय खुद्द उर्जा मंत्री व्यक्त करीत आहेत त्यामुळे याची गंभीरता अधिकच वाढत असून याकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
ही घटना मानवी चुकांमुळे घडल्याचे सांगण्यात येत आहे मग या घटनेला जबाबदार कोण? घटनेची चौकशीला विलंब का? संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली? अद्याप कुणावरही कारवाई का करण्यात आली नाही? ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देणार का? सदरची घटना ही घातपात असल्याचा संशय ऊर्जा मंत्र्यांनी व्यक्त केला आहे तर मग याबाबत तपास यंत्रणाना अवगत करण्यात आले का? तपास यंत्रणाना याबाबत काही तपास करणार आहेत का?
ऊर्जा खात्याला काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे वारंवार ऊर्जा मंत्री सांगत आहेत तर मग कोण या खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करते आहे? सन २०१० साली अशी घटना घडली होती त्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या अजय मेहता समितीच्या अहवालाच्या शिफारशी सरकारने स्विकारल्या होत्या का? असल्यास त्यानुसार उपाय योजना करण्यात आल्या का ? भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून अजय मेहता समितीचा अहवाल व सूचना याबाबत येणाऱ्या काळात शासन कोणत्या उपाय योजना करणार आहे?
असे प्रश्न उपस्थित करुन याबाबतीत अधिक स्पष्टता यावी व भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून शासनाने करावयाच्या उपाय योजनांचा तातडीने खुलासा करावा ही विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रात केली आहे.

 327 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.