मनसे फॅक्टरमुळे आता १ कोटींची रक्कम रुग्णांना परत

नवी मुंबई मनपाची खाजगी रुग्णालयांवर कारवाई…

नवी मुंबई : वाढीव दराने देयके वसूल करीत काेराेना रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी रुग्णालयांच्या विरोधात मनसेने नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली आवाज उठविल्यानंतर महानगरपालिकेने या रुग्णालयांना दणका दिला आहे. सप्टेंबर महिन्यात ३२ लाख तर आता ऑक्टोबर महिन्यात १ कोटी रुपये रुग्णांना परत करण्यात आले आहेत.
मनसेने सलग या रुग्णालयांच्या मुजोरी विरोधात आवाज उठविल्यानंतर गेल्या महिन्यात या रुग्णालयांवर कारवाई करा अन्यथा मनपा आयुक्तांना खाजगी हॉस्पिटलचे तारणहार म्हणून मोर्चा काढून पुरस्कार देण्याचा इशारा मनसेने दिला होता. त्यानंतर मनपाने खाजगी रुग्णालयांच्या बिल तक्रारी संदर्भात हेल्पलाईन नंबर तसेच स्वतंत्र्य देयक तपासणी केंद्राची निर्मिती केली होती. या कोविड कालावधीतील ५ ही महिन्यातील एकूण एक बिलाचे ॲाडीट करुन ज्यादा घेतलेले पैसे रुग्णांना परत करावे अशी मागणी मनसेने कायम लावून धरली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये नवी मुंबईतील विविध रुग्णालयांच्या बिलाचे ऑडिट करून ३२ लाख रुपये रुग्णांना परत करण्यात आले होते. तसेच ऑक्टोबर महिन्यात नागरिकांनी पालिकेकडे केलेल्या तक्रारी नुसार ४१ लाख ३८ हजारांची रक्कम परत करण्यात आली आहे तर पालिकेच्या विशेष लेखा पथकाकडे प्राप्त झालेल्या ८१२ देयकांपैकी ६६२ देयकांची प्राथमिक तपासणी करीत त्यातील ६२ लाख ८८ हजार ८२३ रुपये इतक्या रकमेचा परतावा रुग्णांना करण्यात येणार आहे.
रुग्णांच्या मनपा कडे प्राप्त झालेल्या तक्रारी नुसार या तेरणा रुग्णालय (नेरुळ) १९ लाख ६४ हजार, डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय (नेरुळ) ६ लाख ३६ हजार, पीकेसी रुग्णालय ३ लाख ४२ हजार ५, फॉर्टिझ रुग्णालय (वाशी) २ लाख ५० हजार, अपोलो रुग्णालय (बेलापुर) २ लाख २७ हजार, रिलायन्स रुग्णालय (कोपरखैरणे) १ लाख ४२ हजार, न्युरोजन रुग्णालय (सीवूडस) १ लाख ३७ हजार ४२९, फ्रोझान रुग्णालय १ लाख २६ हजार, ग्लोबल हेल्थ केअर रुग्णालय १ लाख १५ हजार २०२, सिद्धीका हॉस्पिटल (कोपरखैरणे) १ लाख १४ हजार, एमजीएम रुग्णालय (बेलापुर) ५६ हजार १६१, इंद्रावती रुग्णालय (ऐरोली) २९ हजार रक्कम नागरीकांना परत करण्यात आलेली आहे किंवा देयक रकमेतून परत करण्यात आलेली आहे तर विशेष पथकाच्या तपासणीनुसार वाढीव देयकामधून फॉर्टिझ रुग्णालय (वाशी) १७ लाख ८६ हजार ४२५, फ्रोझॉन रुग्णालय (घणसोली) १४ लाख ४१ हजार ३३५, सनशाईन रुग्णालय (नेरुळ) १२ लाख ३२ हजार २७२, एमपीसीटी रुग्णालय (सानपाडा) १० लाख ९० हजार ९४०, एमजीएम रुग्णालय (वाशी) ७ लाख ३७ हजार ८५१ रुपये परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नवी मुंबईकरांच्या हक्काचे पैसे त्यांना परत मिळवून दिल्याचा आनंद असून या पूढे ही रुग्णांना आकारलेल्या प्रत्येक बिलामागील रक्कम परत मिळवून देत नाही तो पर्यंत हा लढा नवी मुंबई मनसेच्या वतीने सुरुच राहणार असल्याचे मत मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केले आहे. तसेच संपूर्ण विषय गांभीर्याने घेऊन त्यांवर कारवाई केल्या बद्दल मनसेने मनपा आयु्क्त अभिजित बांगर यांचे आभार मानले आहेत. लोकांना अजुनही या बिलांबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी मनपा प्रशासन आणि मनसेला संपर्क करावा असे आवाहन ही मनसेने केले आहे.

 347 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.