`क्लस्टर’च्या सर्व्हेला शिवसैनिकांचाच विरोध

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न कसे होणार साकार? भाजपा स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांचा सवाल

ठाणे : ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा क्लस्टर' हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र या योजनेविरोधातच शिवसैनिकांनीआवाज’ उठवला आहे. कॅसरमील जवळील आझादनगर नं.१ (मसाणवाडा) येथे बायोमेट्रीक सर्व्हेक्षण सुरु असून या सर्व्हेला स्थानिक शिवसैनिक चंद्रकांत सुर्वे आणि अमित जैसवाल यांनी विरोध केला आहे. पालकमंत्री यांचे क्लस्टरच्या माध्यामातून सर्वसामान्यांना मालकी हक्काचे अधिकृत घर देण्याचे स्वप्न आहे पण हे स्वप्नाला खिळ घालण्याचे काम या स्थानिक शिवसैनिकांकडून होत असल्याचा आरोप भाजपा नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला आहे.
कॅसरमील जवळ असलेला आणि आनंद पार्कची मागील बाजू असलेल्या आझादनगर नं.१ (मसाणपाडा) येथे समूह विकास योजनेअंतर्गत येथील झोपडपट्टीचा विकास करण्याचे नियोजित आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात या योजनेचे काम सुरु आहे. आझादनगर १ येथील विभागाचाही या योजनेत समावेश आहे. या संदर्भात या विभागात मागील काही महिन्यांपासून बैठका सुरु आहेत. तसेच महापालिकेने तसे येथिल नागरिकांना कळवून बायोमेट्रीक सर्व्हेक्षणाचे कामही सुरु केले आहे. मात्र आज अचानक येथील शिवसैनिक चंद्रकांत सुर्वे आणि अमित जैसवाल यांनी सर्व्हेक्षणाला विरोध केल्याची माहिती नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली. आमच्या शंकांचे प्रथम निरसन करा नंतर सर्व्हेक्षण करा अशी त्यांची मागणी होती. वास्तविक यापुर्वी या संदर्भात बैठका झाल्या असून नागरिकांचे हित साधण्यापेक्षा काही जण स्वत:ची पोळी भाजण्यासाठी आपल्या नेत्याचे स्वप्न धुळीस मिळवत असल्याची टिका कृष्णा पाटील यांनी केली आहे.

 348 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.