शेलवली शाळेच्या विद्यार्थ्यांना टॅबची भेट

शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आदिवासी उन्नती मंडळाने दिले योगदान

शहापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शेलवली(बांगर)जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे म्हणून मुंबईतच्या आदिवासी उन्नती मंडळाच्या माध्यमातून टॅब उपलब्ध करून दिले.
कोरोनामुळे सर्व शाळा बंद असून सध्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शिकविले जाते.ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध आले तरी सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने त्यांना ऑनलाईन अभ्यास करता यवत नसल्याने शहापूर तालुक्यातील शेलवली (बांगराची)या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक बाळकृष्ण धानके व सहा सहशिक्षकांनी
मुंबई येथील आदिवासी उन्नती मंडळ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून शाळेतील १४२ विद्यार्थ्यांना रोजच्या अभ्यासासाठी चक्क महागडे टँबलेट उपलब्ध करुन देवून टँबलेटवर शिक्षण देणारी ठाणे जिल्ह्यातील पहिली ग्रामीण शाळा बनवली आहे.
शाळेतील शिक्षक डॉ.हरिश्चंद्र भोईर आणि सुधाकर पाटील यांनी आदिवासी उन्नती मंडळ, मुंबई या समाजसेेवी संस्थेशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब पुरविण्याची विनंती केली. शिक्षकांची ही तळमळ, शाळेचे गुणवत्तापूर्ण शिक्षणातील योगदान आणि विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती यांचा विचार करून अखेर मंडळाने मदतीचा हात पुढे केला.मंडळाचे समन्वयक रामचंद्र कशिवले यांनी मंडळाचे अध्यक्ष राजूशेठ यांच्याशी सल्लामसलत करून ६५ टॅब, कव्हर, हेडफोन, मेमरी कार्ड, अभ्यासक्रम, सिमकार्ड, राऊटर रिचार्ज यासाठी सुमारे ७ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य शाळेला उपलब्ध करून दिले आहे. दोन विद्यार्थ्यांना एक याप्रमाणे या टैबचे वाटप करण्यात आले. अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या काही पालकांनी सुद्धा टॅब स्वीकारले.
उपसरपंच जयश्री बांगर,पत्रकार श्यामकांत पतंगराव, संतोष दवणे, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध असलेली शेलवली (बांं.) ही ठाणे जिल्ह्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा ठरली आहे.येथील मुख्याध्यापक बाळू धानके, सहशिक्षक डॉ.हरिश्चंद्र भोईर, सुधाकर पाटील, रेखा पाटील, रामदास बांगर, हरी गावंडा यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले असून ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनीही शाळेला शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी आदिवासी उन्नती मंडळाने शेलवली येथील ८० व शेंद्रूण येथील ८० आदिवासी कुटुंबांना एक महिन्याच्या किराणा सामानाचेही वितरण केले.

 401 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.