मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी केली नुकसान ग्रस्त भातशेतीची पाहणी

तातडीने जिल्हाधिकारी व शासनाकडे अहवाल सादर करण्याचे कृषि अधीक्षकांना दिले निर्देश

शेतकऱ्यांना दिला गटशेती करण्याचा सल्ला

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कुंडनपाडा, उंबरमाळी, अजनुप  गावात करपा व कडाकरपा रोगामुळे भात पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. या घटनेची  दखल घेत आज मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी प्रत्येक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून  नुकसान झालेल्या शेतीचा अहवाल तातडीने ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व  शासनाकडे  सादर करण्याचे निर्देश कृषि अधीक्षकाना दिले. दरम्यान  शेतकऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्यांनी गटशेती करावी असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम भगत, पंचायत समिती सदस्य राजेश कांबळे, उपसरपंच  सचिन निचिते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, गट विकास अधिकारी सुशांत पाटील, पंचायत समिती कृषि अधिकारी विलास घुले, तालुका आरोग्य अधिकारी तरुलता धानके, आदी अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी कृषि तज्ज्ञांची समिती गठीत करून या समितीची टीम प्रत्येक्ष घटनास्थळी येऊन नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली. यामध्ये आठ ते दहा शेतकऱ्यांचे अंदाजे ३.१५ हेक्टर क्षेत्रावर किडरोग ग्रस्त झाल्याचे आढळून आले.  यावेळी समितीने कीड का लागली याचा अहवाल  देत  उपायोजना सुचविल्या आहेत.      
समितीने प्रत्यक्ष क्षेत्रावर भेट दिली असता , संबंधित  शेतात पाणी साठल्याचे तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे करपा व कडाकरपा रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले . पाहणी दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी जयश्रीराम , जोरदार , रुपम , दप्तरी -१००८ , शबरी , YSR व स्थानिक सुधारीत वाणाच्या भाताची लागवड केल्याचे सांगितले .  त्याचप्रमाणे सदरच्या रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सीक्लोराईड व स्ट्रप्टोसायक्लीन या बुरशीनाशकांची फवारणी केल्याचे सांगितले परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे रोगाची तीव्रता कमी न झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .
स्थळ भेटी दरम्यान किडरोग तज्ञांनी व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी करपा व कडाकरपा रोगाच्या नियंत्रणासाठी खालील प्रमाणे शिफारशी केल्या
१ ) निमगरवा व गरवा या भात जातीच्या वाणांवर ( उशीरा येणाऱ्या जाती ) ट्रायसायक्लोझोन १० ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात किंवा हेक्साकोनॅझोल २० मिलि . प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असे सुचविले .
२ ) शेतामध्ये जास्त प्रमाणात साचलेले पाणी बाहेर काढण्यात यावे .
३ ) या वर्षाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील वर्षी भात लागवड करण्यापूर्वी ३ टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रकिया करून त्यानंतर थायरम किंवा कार्बनडॅझिम ३० ग्रॅम प्रति १० कि.ग्रॅ . बियाण्यावर बीज प्रकिया करावी व नंतरच बियाणे पेरावे .
४ ) केवळ युरीया या खताचा वापर न करता , समतोल प्रमाणात नत्र , स्फुरद व पालाश युक्त खतांचा वापर करावा .
५ ) अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव सुरू होताच ताबडतोब कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम व स्ट्रप्टोसायक्लीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी , व आसपासच्या सर्व भात उत्पादक शेतकऱ्यांना सुचीत करावे .
     या प्रकारे उपाययोजना सुचवण्यात येऊन गावातील उपस्थित शेतकऱ्यांना भात लागवडी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .

 412 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.