ठाणे महापालिकातर्फे स्वच्छता पंधरवड्यास सुरूवात

संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा ठाणे महापालिकेचा निर्धार,महापौर व महापालिका आयुक्तांची घोषणा

ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्यसाधून ठाणे महापालिका क्षेत्रात २ ऑक्टोबर पासून स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम सुरू झाला असून या निमित्ताने संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्धार ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिली. महापालिका भवन येथे आज स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त २ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत असून या निमित्ताने पालिका क्षेत्रात विविध ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे.
शहरातील स्वच्छता आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा विषय असून सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना यापूर्वीच महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर प्रभाग समिती स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त यांचेकडून आपला प्रभाग स्वच्छ राहिल याची दक्षता घेण्यात येत आहे. सर्व प्रभाग समिती, घनकचरा विभाग व आरोग्य विभाग यंत्रणा रस्त्यावर उतरली असून शहरात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या स्वच्छता पंधरवड्यात शहरातील सर्व रस्त्यावर साचलेला कचरा, रस्ते, गटर साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची साफसफाई, स्प्रेईंग करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात शहरातील स्वच्छता महत्वाचा विषय असून महापालिकेच्यावतीने शहरातील स्वच्छता करण्यात येत आहेच परंतु नागरिकांनी देखील आपले घर, आपला परिसर स्वच्छ ठेवून या मोहिमेत सहभागी व्हावे असेही आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी यावेळी केले.

 374 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.