शहापूर मतदारसंघातील नामपाडा व गारगाई प्रकल्पाचे प्रश्न तातडीने मार्गी लावा

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

शहापुर (शामकांत पतंगराव) : ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभा मतदारसंघातील जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या नामपाडा लघुपाटबंधारे व  गारगाई प्रकल्पांच्या अडीअडचणी  संदर्भात तातडीने कार्यवाही करुन हे प्रकल्प मार्गी लावावेत, असे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हे दोन्ही प्रकल्प लालफितीत अडकल्याने गेले अनेक वर्षे रखडले आहेत. ते लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
  या धरणांच्या प्रश्ना संदर्भात एका विशेष बैठकीचे आयोजन गुरुवारी मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी शहापूरचे आमदार दौलत दरोडा तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई मनपा मुख्य अभियंता शिरीष उजगावकर व इतर अधिकारी, शहापूर व वाडा तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. क्षत्रिय अधिकारी झुम एपद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी या मतदारसंघातील शहापुर तालुक्यातील नामपाडा (सावरोली-सो) या लघु पाटबंधारे प्रकल्पा संदर्भात सविस्तर चर्चा केली. सदरील प्रकल्पासाठी मूळ प्रशासकीय मान्यता २००४ सालची आहे. त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता देणे तसेच त्याठिकाणी इतर अनुषंगिक कामे अधिक गतीने होणे यासाठी असलेल्या अडीअडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश मंत्री जयंत पाटील यांनी दिले. 
तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाई हा प्रकल्प मुंबई महानगरपालिके मार्फत राबविण्यात येत आहे. त्या ठिकाणी पुर्नवसनासाठी वनविभाग तसेच अन्य पर्यायी जागा, रेडीरेकनरच्या दराप्रमाणे दर निश्चित करणे, संबंधित ग्रामस्थांसाठी शेती व पिण्यासाठी राखीव पाणीसाठा ठेवणे व इतर सोयीसुविधा याबाबत आ. दौलत दरोडा यांनी तेथील ग्रामस्थांचे प्रश्न बैठकीत मांडले. यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने ग्रामस्थांच्या प्रश्नांबाबत योग्य ते ठोस निर्णय घ्यावेत असे निर्देशही मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी दिले. 

 507 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.