शासनाने पत्रकारांना विमा योजनेत समाविष्ट करावे

कोरोना काळात पत्रकारांना ताबडतोब मदत करण्यासाठी ठाण्यातील पत्रकारांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

ठाणे : कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरून पत्रकारांनी प्रचंड मेहनत घेतली. कोरोना संदर्भात अनेक पत्रकारांनी बातम्या दिल्या,याच दरम्यान राज्यात ५०० पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झालेली आहे, ५० च्या जवळपास पत्रकारांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत, आणि कोरोनानं २५ पत्रकारांचे बळी गेले आहेत. “पत्रकार हे कोरोना यौध्दे” असून मृत्यू पावलेल्या पत्रकारांना शासनाने मदत करावी या मागणीसाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघ,ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ्याच्या वतीने शुक्रवारी निवासी जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे,ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विकास काटे, सदस्य गजानन हरीमकर, वसंत चव्हाण, विभव बिरवटकर, प्रफुल गांगुर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळात माथेरानचे संतोष पवार किंवा पुण्याचे पांडुरंग रायकर यांचा मृत्यू त्यांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने झाला आहे.पुन्हा अशी वेळ कोणाही पत्रकारावर येऊ नये यासाठी पत्रकारांना अग्रक्रमाने बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होईल अशी व्यवस्था व्हावी आणि त्यासंबंधीचा अध्यादेश लगेच काढला जावा अशी मागणी देखील ठाण्यातील पत्रकारांनी केली असून अडचणीत आलेले माध्यम क्षेत्र आणि असंख्य पत्रकारांवर आलेली बेकारीची वेळ लक्षात घेऊन सर्व मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकार पांडुरंग रायकर आणि संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले होते. त्यानुसार पुणे आणि रायगडच्या सिव्हिल सर्जन यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले होते.. या चौकशीचे काय झाले ते समजले नाही. दोन्ही पत्रकारांच्या मृत्यूस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करत शासनाने लवकरत लवकर मागणी मान्य कराव्यात याबाबतचे निवेदन यावेळी देण्यात आले.

 466 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.