कांदा निर्यातबंदी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन

आंदोलक महिलांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या, निर्यातबंदी न उठवल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा दिला इशारा

ठाणे : जगभरात लॉकडाऊन असताना शेतीत खपून मोठ्या कष्टाने शेतकर्‍याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकर्‍याला असतानाच कांद्याची निर्यात बंदी करुन केंद्र सरकारने शेतकर्‍यांची कोंडी केली आहे. त्या निषेधार्थ गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन केले.
मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून केंद्र सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्ष सुजाता घाग, कार्याध्यक्ष सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक महिलांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
यावेळी सुजाता घाग यांनी सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी म्हणजे ४ जून रोजी केंद्र सरकारने कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करुन स्वतःची पाठ थोपटवून घेतली होती. त्यानंतर आता कांद्याच्या माध्यमातून दोन पैसे मिळणार असतानाच निर्यातबंदी करुन शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी केली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. आता दोन पैसे मिळणार असतानाच केंद्र सरकारने निर्यातबंदी लादून शेतकर्‍यांना आर्थिक संकटात टाकले आहे. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले असून निर्यातबंदी न उठवल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.
या आंदोलनात फुलबानो पटेल, माधुरी सोनार, ज्योती निंबर्गी, शुभांगी कोळपकर, वंदना लांडगे, सुरेखा शिंदे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

 507 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.