अनलॉकच्या स्थितीचा लाभ घेत निरंकारी भक्तांचे रक्तदान अभियान पुनश्च सुरु

ठाण्यामध्ये दोन शिबिरांत २१६ युनिट रक्तदान

ठाणे : मानवतेच्या सेवेच्या प्रति सजग असलेल्या संत निरंकारी मिशनच्या वतीने सध्याच्या अनलॉकच्या स्थितीचा लाभ घेत संत निरंकारी सत्संग भवन, गणेशवाडी, ठाणे तसेच संत निरंकारी सत्संग भवन, साठे नगर, वागळे इस्टेट, ठाणे येथे अनुक्रमे दिनांक ६ सप्टेंबर आणि १३ सप्टेंबर रोजी दोन रक्तदान शिबिरांचे आयोजन केले ज्यामध्ये अनुक्रमे ८६ युनिट आणि १३० युनिट मिळून एकंदर २१६ युनिट रक्तदान करण्यात आले आहे.
      संत निरंकारी रक्तपेढीचे डॉक्टर्स व वैद्यकीय तंत्रज्ञ यांच्या चमूने कोविड-१९ च्या बाबतीत असलेली सर्व प्रकारची काळजी घेत आणि यासंदर्भातील शासनाच्या मार्गदर्शनाचे पालन करत ही रक्तदान शिबिरे यशस्वीरित्या संपन्न केली. यामध्ये सहभागी सर्वांनीच योग्य प्रकारे मास्क परिधान करुन, सामाजिक अंतर ठेवत तसेच सॅनिटाईझरचा उचित वापर करत ही रक्तदान शिबिरे यशस्वी केली.
      वागळे इस्टेट येथील भवनमध्ये आयोजित केलेल्या शिबिराला स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सदिच्छा भेट दिली आणि संत निरंकारी मिशन मानवतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे आपल्या कृतीतून सिद्ध करत असल्याचे सांगून मिशनच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.
      रक्तदानाचे हे महान कार्य यापुढेही निरंतर चालू राहणार असून मिशनच्या वतीने पुढील रक्तदान शिबिर २७ सप्टेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन, कळवा येथे आयोजित करण्यात आले आहे.
      संत निरंकारी मंडळाचे स्थानिक संयोजक आणि मुखी यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सेवादल तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने वरील दोन्ही रक्तदान शिबिरे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.        

 465 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.