महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी दिले आदेश
ठाणे : कोविड १९ चा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणा-याविरूद्ध ५०० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये या ठिकाणी अनेक व्यक्ती विना मास्क संचार करतानाचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणा-या व्यक्तींकडून ५०० रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण व कर विभागाचे बीट निरीक्षक, बीट मुकादम त्याचप्रमाणे पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या कारवाई अंतर्गत विना मास्क पायी चालणा-या व दुचाकीवरून जाणा-या व्यक्तींकडून ५०० रूपये दंड वसूल करण्यात यावा असे असे आदेशात नमूद करण्यात आले असून दंडात्मक कारवाई करणे हा महापालिकेचा उद्देश नसून मास्कचा वापर बंधनकारक करणे हा असल्याने नागरिकांनी कोरोनाविरूद्धच्या लढाईमध्ये महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
434 total views, 1 views today