जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन -१० सप्टेंबर २०२०
मॉरल समपुदेशक ही आजच्या समाजाची गरज
 ठाणे : सध्या भारतामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येविषयी विविध आरोप प्रत्यारोप होत असून आजच्या  तरुण पिढींमध्ये आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या मानसिकतेवर मात्र कोणी बोलताना दिसत नाही हे दुर्दैव आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून जाहीर केला असून कोरोना संकटकाळात या दिनाला फार महत्व आले आहे. संसार नीट चालला नाही, परीक्षेत मार्क कमी मिळाले , आर्थीक संकट आले या कारणांसोबतच आता आत्महत्यांची काही विचित्र कारणे समोर येत आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आजच्या तरुण पिढीने आपल्या सुख दुःखाची एक नवीन परिभाषा सिमीत केली असून त्यांनी आखलेल्या परिघामधून ते थोडे जरी दुर्लक्षित झाले  तर आपले जीवन त्यांना व्यर्थ वाटू लागते. भारतामध्ये  २०१८  व २०१९ या दोन वर्षाच्या काळातील  आत्महत्यांच्या आकडेवारीची तुलना  केली तर २०१९ मध्ये  तरुणांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१८ मध्ये ८९,४०७  तरुणांनी आत्महत्या केली होती तर २०१९ मध्ये सुमारे १.३९ लाख लोकांनी आत्महत्या केली, त्यापैकी  ९३,०६१ जण तरुण वयोगटातील होते म्हणजेच २०१९ मध्ये  आत्महत्यांमध्ये ४. ४  टक्क्यांनी वाढ झाली आहे. याविषयी अधिक माहिती देताना  तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे मनोविकार तज्ञ डॉ ओंकार माटे सांगतात, ” काही अपवाद वगळता आत्महत्या ही काही अचानक घडणारी घटना नाही आहे, कारण आत्महत्या करणारी व्यक्ती ही प्रथम  मानसिक रित्या आजारी पडते व त्यांची दखल अथवा त्यावर उपाय होत नसल्यामुळे आत्महत्या वाढत आहेत. तरुण पिढींमध्ये सहनशीलता फारच कमी असल्यामुळे अनेक तरुण निराशेच्या गर्तेत  व्यसनाच्या आहारी जातात. घरच्या व्यक्तींकडून तर कधी जवळच्या मित्र मैत्रिणीकडून अवहेलना झाली तर ही तरुण मंडळी लगेच व्यसनाला जवळ करतात, प्रेमभंग झाला, अपयश आले तर हिंदी चित्रपटातील नायक दारूची बाटली तोंडाला लावतात हे लहान वयात  नकळत संस्कारही याला कारणीभूत आहेत. २०१९ मध्ये आत्महत्या करणाऱ्या नागरिकांमध्ये ६७ टक्के तरुण लोक होते, ज्यांचे वय १८ ते ४५ वर्षांदरम्यान आहे. यामध्ये कौटुंबिक समस्या, लग्नाशी संबंधित समस्या मानसिक आजाराच्या  समस्या तसेच  ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या व्यसनामुळे व प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे, म्हणजेच हे सर्व नागरिक मानसिक दृष्टया आजारी होते कारण त्याना आपल्या आयुष्यापेक्षा आयुष्यामध्ये असलेल्या समस्या मोठ्या वाटल्या, म्हणूनच आज  प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की  त्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी सुसंवाद साधला पाहिजे कारण सर्वच निराशाग्रस्त नागरिकाला समुपदेशक अथवा इतर मदत मिळतेच असे नाही. संपर्कात असलेल्या व्यक्तीत झालेले मुख्य बदल, तसेच त्यांच्या बदललेल्या सवयी यावर आपण लक्ष दिले तर प्रत्येक नागरिक हा समुपदेशक बनू शकेल, कारण या व्यक्तीना आपले म्हणणे ऐकणारा म्हणजेच संवाद साधणारा व्यक्ती हवा असतो. “
 कोरोना संक्रमण व आत्महत्या याचे विश्लेषण करताना  कळंबोली येथील  सुअस्थ  हॉस्पिटलमधील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व व्यसन थेरपिस्ट डॉ. शीतल बिडकर सांगतात, ” कोरोना या महामारीच्या आजारामुळे समाजामध्ये असहाय्यता, अनिश्चितता,एकांतवास आणि आर्थिक ताण तणाव व नात्यांमध्ये दुरावा वाढला आहे  परिणामी नैराश्य, चिंता, झोपेचे आजार व एकूणच  मानसिक विकार वाढले असून  याचा परिणाम म्हणून संपूर्ण जगात आत्महत्यांचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत आहे. गेल्या तीन महिन्यात रुग्णांमध्ये स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ओसीडी या विकारांनी ग्रस्त रुग्णांची मानसोपचार तज्ज्ञांकडे गर्दी वाढत आहे. २०१९ च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात २० कोटी लोकांना प्रत्यक्ष मानसिक आरोग्याच्या सुविधांची आवश्यकता आहे आणि भारताचा नैराश्यग्रस्त व्यक्ती असलेल्या देशांत सहावा क्रमांक लागतो. म्हणजे खरतर मानसिक आरोग्याला आपल्याकडे प्राधान्यक्रम असला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही.” 
 युवा आत्महत्यांचे मुख्य कारण म्हणजे कौटुंबिक कलह, प्रेमाचे विषय, मादक पदार्थांचे सेवन, मानसिक आजार असून ही आत्महत्येची कारणांची विस्तृत वयानुसार विश्लेषण करण्यात आले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार कौटुंबिक समस्या हे १८ वर्षांवरील आणि ४५ वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आत्महत्या करण्याचे सर्वात मोठे कारण आहे. समाजात वावरताना अनेक नागरिक मॉरल पोलिसिंग करत असतात म्हणजेच जेथे अन्याय व अत्याचार होत असेल तेथे आवाज उठवतात त्याच प्रकारे आता दक्ष नागरिकांना मॉरल समपुदेशक बनण्याची गरज आहे असे मत डॉ ओंकार माटे यांनी व्यक्त केले.
461 total views, 1 views today