कबड्डी या खेळात करीयर करून प्रो कबड्डी स्पर्धेत खेळण्याची प्रणवची आहे इच्छा
शहापूर (शामकांत पतंगराव) : शहापुर तालुक्यातील किन्हवली येथील इयत्ता बारावीत शिकणारा विद्यार्थी व सध्या अस्नोली येथे राहणारा प्रणव कनकोसे याची जस्ट कबड्डी या संस्थेच्या मुंबई मास्टर संघातून मुंबईसाठी निवड झाली आहे.गावात दरवर्षी होणाऱ्या कबड्डी सामन्यांत खेळणाऱ्या प्रणवच्या या यशामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 प्राथमिक शिक्षक असलेल्या महादू कनकोसे यांचा मुलगा  प्रणव याची जस्ट कबड्डी या संस्थेच्या मुंबई मास्टर संघातून मुंबईसाठी नुकतीच निवड झाली आहे.
 इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत गावातीलच प्रगती विद्यालयात शिकणाऱ्या प्रणवने परिसरात होणाऱ्या अनेक कबड्डी सामन्यांत धवल कामगिरी करून यश खेचून आणले आहे.
 तालुका व जिल्हा पातळीवरील स्पर्धा गाजविल्यानंतर जस्ट कबड्डी या संस्थेने त्याला उल्हासनगर येथील सराव केंद्रात प्रशिक्षण दिले.उल्हासनगर ते अस्नोली असा रोजचा प्रवास करणे शक्य नसल्याने त्याने मध्य रेल्वेचे स्टेशन असलेल्या वासींद या ठिकाणी सरस्वती विद्यालयात अकरावीत प्रवेश घेतला.
 प्रशिक्षणा दरम्यान प्रणवच्या खेळाचे मूल्यांकन होऊन संस्थेने त्याला हरियाणा येथील सॅफीडॉन शहरातील मुख्य केंद्रात सरावासाठी ठेवले. २०२० मध्ये झालेल्या इंडो नेपाळ या स्पर्धेत सुद्धा त्याने नेपाळ मध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.
 या दरम्यान जस्ट कबड्डी या संस्थेने त्याच्याशी करार करून जे के एल मुंबई मास्टर या संघातून मुंबईसाठी निवड केली.
 दरवर्षी अस्नोली येथील ओंकार क्रिडा मंडळातर्फे भरविण्यात येणाऱ्या कबड्डी स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखविणाऱ्या प्रणवच्या या यशाबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याला खेळाचे प्राथमिक धडे व मार्गदर्शन शिक्षक असलेल्या वडिलांकडून मिळाले आहे. कबड्डी या खेळात करीयर करून प्रो कबड्डी स्पर्धेत खेळण्याची इच्छा असलेल्या प्रणवने सध्या किन्हवली येथील शहा विद्यालयात बाराविच्या कला शाखेत प्रवेश घेतला आहे.
604 total views, 1 views today