पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा अजब दावा
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना रुग्णांच्या संख्येने ३१ हजार ५०० चा आकडा ओलांडला आहे. तर दररोज ४०० च्या आसपास रुग्णांची नोंद होत आहे. रोज वाढणाऱ्या या संख्येला बिल्डींगमध्ये राहणारे नागरिक जवाबदार असून ८० टक्के रुग्ण हे बिल्डिंगमध्ये राहणारे असल्याचा अजब दावा पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी केला आहे.
         गणेशोत्सवानंतर कल्याण डोंबिवली मधील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज ४०० – ४५० रुग्णसंख्या येते. यात सुमारे ८० टक्के रुग्ण हे बिल्डींगमधले आहेत. बिल्डींगमधले रुग्ण होमआयसोलेशनच्या नियमांचे पालन करत नसल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे येत आहेत. यावर तोडगा काढण्यसाठी पालिका आयुक्तांनी यासंदर्भात सर्व प्रभाग अधिकारी, आरोग्य विभाग, पोलीस उपायुक्त यांची बैठक बोलवली होती. यामध्ये सर्व कंटेनमेंट झोन, सगळ्यांनी मास्क वापरणे, सोशल डीस्टन्सचे पालन करणे बंधनकारक असणार असून याचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र प्रत्येक सोसायटीच्या सचिवांना पाठविणार असल्याची माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.
       दरम्यान रुग्णसंख्या वाढीला बिल्डींगमधील नागरिकांना जवाबदार धरल्याने बिल्डींगमधील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून महानगरपालिका कोरोना रोखण्यात अपयशी ठरत असतांना त्याचे खापर नागरिकांवर फोडण्याचा प्रकार अजब असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. 
604 total views, 1 views today