झूम व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुमारे ५०० माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी तब्बल साडेतीन तास हृद्य आठवणी, संस्कार, आपुलकी, अशा अनेक अनुभवांना उजाळा मिळाला.
डोंबिवली : शिक्षक दिनाच्या निमित्ताने रेल चाईल्ड संस्था संचालित, महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेने सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळेचे १९६९ पासूनचे माजी विद्यार्थी यांचा ‘ऋणानुबंध’ या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमातून सन्मान घडवून आणला. झूम व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुमारे ५०० माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी तब्बल साडेतीन तास हृद्य आठवणी, संस्कार, आपुलकी, अशा अनेक अनुभवांना उजाळा मिळाला. आपल्या शिक्षकांचा विशेषतः शिपाई काकांचा आवाज ऑनलाईन ऐकण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे कान आसूसलेले होते.
महात्मा गांधी विद्यामंदिर शाळा, डोंबिवली पश्चिमेला १९६९ साली सुरु झाली. एका साध्या, छोट्याशा खोलीत थिटे गुरुजींच्या पुढाकाराने सुरू झालेल्या शाळेचा अरविंद भानुशाली सरांनी वटवृक्ष केला. सध्या कार्यरत असलेल्या शाळेतील सर्व शिक्षकांनी, शाळेला पुन्हा ऊर्जितावस्था येऊन विद्यार्थी संख्येत वाढ व्हावी या हेतूने आजी माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा ५ सप्टेबरला संध्या ४ ते रात्री ७:३० या वेळेत संगम घडवून आणला.
सुरवातीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, रेल चाईल्ड संस्थेचे आधारस्तंभ दत्तात्रय (अण्णा) रावदेव, नितीशा दिघे व अन्य निकटवर्तीयांना श्रद्धांजली दिली. प्रियांका म्हात्रे (गायिका) व सुनिल कांबळी (तबलावादक) यांनी ऑनलाईन ईशस्तवन, स्वागतगीत सादर केले. छाया पाटील यांनी प्रस्तावनेतून सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा आढावा घेतला. सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लिहीलेल्या हृद्य आठवणींचे “गगन सदन” हे डिजीटल पुस्तक मुख्याध्यापक अंकुर आहेर यांनी तयार केले. त्याचे आॅनलाईन प्रकाशन संस्था उपाध्यक्ष नितीन दिघे यांनी केले भरत अनिखिंड, संदिप मोतीवाले, तनुजा जगांवकर व मनिषा गादिया या माजी विद्यार्थ्यांनी, उषाताई इंगळे, प्राचीताई पेणकर या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकांनी, सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक सुरेश माहुरकर यांनी ५० वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला तसेच शाळेला आणि विद्यार्थ्यांना कोणतीही मदत हवी असल्यास आम्ही सर्व एकत्र येऊ असे आश्र्वासन माजी विद्यार्थ्यांनी दिले. १९७४ च्या बॅचचे माजी विद्यार्थी भरत अनिखिंड यांनी शालेय जीवनातील, शिक्षक व शिक्षकेत्तर यांच्या आठवणी सांगितल्या. विशेष म्हणजे, शिपाई सखुबाई यांच्या आठवणीने त्यांना रडू कोसळले. शाळा समिती अध्यक्ष उल्हास झोपे व अध्यक्षीय मनोगत नितीन दिघे यांनी सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर तसेच माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. प्रिया जोशी यांनी आभारप्रदर्शन केले. ऋणानुबंध हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी विशेष परिश्रम घेतले.
959 total views, 1 views today