शिक्षक दिनानिमित्त इ. १० वीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तासिकेमधून दिले धडे 


इ. ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन विद्यार्थी शिक्षक दिनी आपल्या ताई दादांच्या तासांचा आनंद घेतला, अनेक शंका विचारल्या. ५ सप्टेंबर रोजी मात्र इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी पुस्तका बाहेरील नाविन्यपूर्ण माहिती देवून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले

डोंबिवली : शिक्षक दिनाच्या निमित्ताने रेल चाईल्ड संस्था संचालित, महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेतील इ. १० वी विद्यार्थ्यांनी ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान इ. ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तास घेतले. वास्तविक कोरोना प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन असूनही शाळेने ऑनलाईन विद्यार्थी शिक्षक दिन साजरा करण्याचे ठरविले. हे ऐकून विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला.
इ. १० वी ची ऑनलाईन शाळा, ११  एप्रिलपासून शाळेने सुरु केलेली असल्यामुळे शिक्षकांचे अध्यापन विद्यार्थ्यांनी अनुभवले होते. पण ऑनलाईन विद्यार्थी शिक्षक दिन नक्की कसा साजरा होणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती. विद्यार्थी शिक्षक दिनाचे संपूर्ण नियोजन प्रिया जोशी व वैशाली जाधव या शिक्षिकांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन बैठका घेऊन केले. इ. ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन विद्यार्थी शिक्षक दिनी आपल्या ताई दादांच्या तासांचा आनंद घेतला, अनेक शंका विचारल्या. ५ सप्टेंबर रोजी मात्र इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी पुस्तका बाहेरील नाविन्यपूर्ण माहिती देवून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
विद्यार्थी शिक्षक दिनाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी वैशाली जाधव यांनी विद्यार्थी शिक्षक दिनाच्या नियोजनाची माहिती दिली. प्रिया जोशी यांनी लाॅकडाऊन कालावधीतील शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती  दिली. मुख्याध्यापक अंकुर आहेर यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भाव असतानाही जबाबदारीने शासनाच्या नियमानुसार कामकाज केले याबद्दल सर्वांचे कौतुक केले. तसेच रेल चाईल्ड संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळते, त्याबद्दल ऋण व्यक्त केले.
या विद्यार्थी शिक्षक दिनाची सांगता, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार्थी विश्वनाथ पाटील सरांच्या मार्गदर्शनाने झाली. याप्रसंगी त्यांनी, आदर्श किंवा उत्तम व्यक्ती होण्यासाठी, त्या व्यक्तीने उत्तम श्रोता होणे आवश्यक आहे असे सांगितले. तसेच यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करताना अपयशाने न आणता, मेहनतीच्या बळावर काम केले पाहिजे हे विविध उदाहरणांसह समजावून सांगितले. शाळा समिती अध्यक्ष उल्हास झोपे यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे शाळेतील उत्तम कामाबद्दल कौतुक केले.
विद्यार्थिनी मुख्याध्यापिका मिनाक्षी ठोंबरे हिने मनोगत मांडले. पर्यवेक्षिका दिक्षा सकपाळ, श्रृती जाधव, मधुरा जाधव या विद्यार्थिनी शिक्षिकांनी आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजू शेलार हिने केले. नेहा बागवे हिने आभारप्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेतील सर्व वर्गशिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

 1,103 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.