ठाणे शहरात खड्डे भरणीच्या कामांना वेग

महापालिका आयुक्तांनी कामांचा घेतला आढावा

ठाणे : गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी खड्डे भरणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा हे स्वत: या कामाचा आढावा घेत असून तातडीने शहरातील खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिले आहेत.
ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे आदेश यापूर्वीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच महापौर नरेश गणपत म्हस्के यांनीही तशा सूचना सर्व अधिका-यांना दिल्या आहेत.
महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा हे सातत्याने याचा आढावा घेत असून ते स्वत: रस्त्यांची पाहणी करून कामाची पाहणी करीत आहेत. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे गेले दोन दिवस शहरात विविध ठिकाणी डांबरीकरण आणि रेडिमिक्सच्या माध्यमातून खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यामध्ये उथळसर प्रभाग समितीतंर्गत वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, ऋतू पार्क रस्ता येथील खड्डे डांबरीकरणाच्या माध्यमातून बुजविण्यात आले. मुंब्रा येथील उड्डाणपुलावरील खड्डे रेडिमिक्सच्या माध्यमातून भरण्याची कार्यवाही करण्यात आली.
वागळे इस्टेट प्रभाग समितीतंर्गतही खड्डे भरण्याचे काम सुरू असून ब्रम्हांड येथेही मुख्य रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने बुजविण्याचे काम सुरू आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीतंर्गत चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क रस्ता, वाघबीळ नाका आणि पुरूषोत्तम प्लाझा येथे डब्लूबीएमने खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. नगर अभियंता रविंद्र खडताळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जून अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते खड्डे भरण्याचे काम करीत आहेत.

 549 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.