अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभाध्यक्षच कोरोना पॉझिटीव्ह

नाना पटोले यांनी ट्विट करत दिली माहिती

नागपूर-मुंबई : दोन दिवसांनंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते आमदार, आमदाराचे पीएपर्यंत कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह असलेल्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. मात्र आता दस्तुरखुद्द विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे च कोरोना पॉझिटीव्ह झाल्याने त्या्ंच्या उपस्थितीशिवाय पावसाळी अधिवेशन होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून नियोजित पावसाळी अधिवेशन दोन ते तीन वेळा पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर अखेर ७ आणि ८ सप्टेंबर २०२० रोजी हे अधिवेशन घेण्याचा निर्णय सांसदिय कामकाज समितीने घेतला. तसेच या अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक आमदार, मंत्री आणि त्यांच्या पीएचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला असेल तरच त्यांना विधिमंडळात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ४ आणि ५ सप्टेंबर रोजी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर कोरोनाची टेस्ट करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. जर कोरोना पॉझिटिव्ह अहवाल असेल तर त्या आमदार, मंत्र्याला विधिमंडळात प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
मात्र आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. याची माहिती त्यांनीच स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्यामुळे ते उपस्थित राहणार की त्यांच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे नेटाने किल्ला लढवून अधिवेशन पार पाडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

 658 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.