केडीएमसीच्या २१३९ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली विशेष अर्थसंकल्पीय सभा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२०-२१ च्या २१३९.२२ कोटींच्या अर्थसंकल्पाला उपसुचनेसह मंजुरी देण्यात आली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ६  महिन्यांनंतर केडीएमसीची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन झालेल्या या महासभेत पालिकेचे आर्थिक बजेट सादर करण्यात आले.
या सभेला कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात महापौर, पालिका आयुक्त, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या महासभेचे कामकाज घेण्यात आले. तर उर्वरित सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सभेला उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय निर्देशांनुसर ऑनलाईन पद्धतीने ही महासभा  आयोजित करण्यात आली होती.
याआधी आयुक्तांनी सादर केलेल्या १९९७ कोटींच्या अर्थसंकल्पात स्थायी समिती सभापतींनी १४२ कोटींची वाढ केली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड नियंत्रणासाठी पालिका आयुक्तांनी २१४ कोटींची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
अंदाजपत्रकाच्या जमा बाजूस त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मालमत्ता कर, पाणी पट्टी या करांमध्ये वाढ प्रस्तावित केली होती, त्याचप्रमाणे नगररचना विभागात शासनाकडून कॉमन डिसीआर लागू झाल्यास प्रिमियम एफएसआय म्हणजेच महापालिका क्षेत्रातील नवीन इमारतींकरीता अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक महापालिकेने शासन मंजूरीसाठी प्रस्तावित केला आहे. त्यास मान्यता मिळाल्यास महापालिकेला वाढीव महसूल मिळणे अपेक्षित धरण्यात आले होते. त्याचप्रमाणेविकास अधिमूल्य व मालमत्ता करांव्दारे महसूल अपेक्षित धरला होता. स्थानिक संस्था कर व सहाय्यता अनुदान, शासनाकडून दरमहा प्राप्त होत आहे. तसेच महसूली उत्पन्नवाढीसाठी पार्किंग पॉलिसी निश्चित करण्यात आलेली आहे.
रस्त्यांवर व पदपथांवर अवैधपणे पार्किंग करणाऱ्या वाहन मालकांकडून शिस्तिचा भाग म्हणून दंडात्मक कारवाईव्दारे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते व प्रमुख चौकात ई अँडर्व्हटायझिंगचा वापर करत जाहिरातीव्दारे मिळणारे उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष दिले आहे. महापालिकेच्या ताब्यातील मोक्याच्या जागांमध्ये मोबाईल टॉवर्स व जाहिरात स्तंभ उभारण्यास परवानगी दिल्यास जाहिरातीव्दारे जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यास मदतच होणार आहे.
महापालिका क्षेत्रातील बाजारपेठा व कत्तलखाने यांच्या फि वसुलीचे प्रमाण कर्मचारी वर्ग अपूरा असल्याने कमी होत चालले असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे बाजार फि वसुली व कत्तलखाने यांच्या फि वसुलीचे खाजगीकरण करून त्याव्दारे मोठया प्रमाणात महसूल वसुली होऊन महापालिकेस वाढीव उत्पन्न अपेक्षित धरले आहे. खर्च बाजूमध्ये महापालिका क्षेत्रातील महत्वाचे पूल, पत्री पूल व डोंबिवली पूर्व पश्चिमेस जोडणारा रेल्वे उड्डाण पूल, मांडा टिटवाळा येथे रेल्वे उड्डाण पूल तसेच महापालिका क्षेत्रातील प्रमुख मोठे रस्ते यांची सुशोभिकरणासह, पथदिवे लावणे यासारखी महत्वाची कामे यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याचा विचार या अंदाजपत्रकात करण्यात आला असून घनकचरा व्यवस्थापनाची सर्वात मोठी जबाबदारी लक्षात घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी हाती घेतलेले प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाव्दारे सुरू आहे.
महापालिकेची रुग्णालेय व दवाखाने यामध्ये डायलिसीस सुविधांसह आवश्यक ते सुधार करण्यासाठी व जिल्हास्तरीय रुग्णालय तयार करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. महापालिकेची नाटयगृहे अद्ययावत ठेवण्याकडे कल असून त्यासाठी पूरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी दिली.

 387 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.