राष्ट्रीय कबड्डीपटू अमर पवार यांचे निधन

रेल्वे संघातून खेळल्यामुळे शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराने दिली हुलकावणी

मुंबई : भारतीय रेल्वे संघाकडून सलग ११राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले महाराष्ट्राचे अमर राजाराम पवार यांचे दि. २सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी ते ७१ वर्षाचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. १सप्टेंबर रोजी ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना कुर्ला येथील आर्यन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांची तब्बेत अधिक बिघडली त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि सायंकाळी ५-३०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या घरातच कबड्डी होती. वडील राजाराम पवार यांनी ५वेळा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे नेतृत्व केले होते. काका शिवराम पवार भारतीय व मध्य रेल्वेचे चतुरस्त्र खेळाडू त्याच बरोबर दोन भाऊ, मुलगा, मुली व सून देखील कबड्डी खेळाडू आहेत.
वडील राजाराम पवार व काका शिवराम पवार यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अमरने अमर भारत या संघाकडून कबड्डीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. महिंद्रा, एअर इंडिया या सारख्या कंपनी कडून कबड्डी खेळाडू म्हणून आलेली संधी सोडून त्यांनी काकांच्या मध्य रेल्वेत खेळाडू म्हणून पाऊल ठेवले. एक उत्कृष्ट चढाईपट्टू अशी संपूर्ण भारतात त्यांची ख्याती होती. कोपरारक्षकाला हुलकावणी देत ते मध्यरक्षकाला लाथेने किंवा हाताने कधी टिपत हे त्याला कळत देखील नसे. यशस्वी पकड झाली असे वाटत असताना ते एवढ्या चपळतेने मध्यरेषा गाठत की पकड करणारे अचंबित होऊन पहात रहात. ते दोन्ही कोपऱ्यात तेवढ्याच सहजतेने चढाई करीत. त्यांच्या पायात गती (स्पीड) होती. ते उलट्या (बॅकवरून) पावलाने मध्यरेषा गाठण्यात माहीर होते. १९७१साली मध्य रेल्वे संघात रुजू झाल्या नंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. रेल्वेत खेळाडू म्हणून व संघनायक म्हणून त्यांनी आपली चुणूक दाखविली. पण खेळ कमी झाल्यावर ते त्या संघाचे प्रशिक्षक देखील होते. मुंबई शहर कबड्डी असो. चे ते १५ वर्ष कार्यकारणी सदस्य होते. त्या काळात त्यांनी निवड समिती सदस्य, प्रशिक्षक व व्यवस्थापक आदी भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या.
मुंबई विद्यापिठ संघाच्या निवड समिती सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. आजही ते मुंबईत होणाऱ्या स्पर्धाना नियमित भेटी देऊन आयोजकांना प्रोत्साहित करीत असत. आनंदी आणि हसतमुख असणारे अमर पवार आपल्या बरोबरीच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन या क्षेत्रात कार्य करीत असत. गतवर्षी म्हणजे २०१९ च्या गुढी पाडव्या दिवशी “ओम् कबड्डी प्रबोधिनीच्यावतीने” त्यांच्या कबड्डी खेळातील “उत्कृष्ट योगदाना” बद्दल सन्मानित करण्यात आले होते. अमर जर महाराष्ट्राकडून खेळला असता, तर निश्चितच “शिवछत्रपती पुरस्कार” मिळवून गेला असता. अशा या हरहुन्नरी खेळाडूंच्या आकस्मित निधनाने कबड्डी वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अंत्य संस्कार त्याच दिवशी रात्री उशीरा चेंबूर येथील चरई स्मशान भूमीत करण्यात आला. त्यांचे चिरंजीव आशिष यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. त्यावेळी कोरोनाच्या संसर्गामुळे मोजकी लोक उपस्थित होती. “ पवार घराणे म्हणजे कबड्डीचे घराणे. राजाराम पवार यांनी महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर ठेवले, अमर यांनी रेल्वे संघाचे नाव भारतभर गाजवत ठेवले. पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या या जाणकार खेळाडूला माझ्या व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या पदाधिकारी, खेळाडू, सामनाधिकारी, कार्यकर्ते, संघटक यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे सचिव आस्वाद पाटील यांनी या महान खेळाडूला आदरांजली वाहिली.

 519 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.