बदलापूर पालिकेचे कोविड रुग्णालय सुरू

पालकमंत्र्याच्या हस्ते उदघाटन
झाल्यावर दोन दिवसांनी रुग्णालय झाले कार्यान्वित

बदलापूर : बदलापूर पालिके मार्फत सुरू करण्यात आलेले कोविड रुग्णालय प्रत्यक्षात सुरू झाले आहे. लोकार्पणास झालेल्या विलंबामुळे हे रुग्णालय कार्यान्वित केव्हा होणार याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा उभारत रुग्णसेवा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता बदलापूरमधील कोरोनाच्या रुग्णांना अन्य शहरात धावपळ करावी लागणार नाही. या रुग्णालयात बारा रुग्ण दाखल करण्यात आले आहे.
बदलापूर पश्चिमेकडील गौरी हॉलमध्ये मंगळवारपासून (ता.२५) कोविड रुग्णालय कार्यान्वित झाले आहे. शुक्रवारी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले होते. डॉक्टर व इतर रुग्णालय कर्मचारी उपलब्ध झालेले नव्हते. त्यामुळे लोकार्पण झाल्यानंतर दोन दिवस हे रुग्णालय प्रत्यक्षात सुरू झाले नव्हते. पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून डॉक्टर, परिचारिका व इतर रुग्णालय कर्मचारी उपलब्ध करून घेतले. त्यामुळे मंगळवारपासून हे कोविड रुग्णालय बदलापूरकरांना रुग्णसेवा देण्यास सज्ज झाले आहे. या रुग्णालयात तीन शिफ्टमध्ये १४ डॉक्टर सेवा देणार असून पहिल्याच दिवशी दाखल झालेल्या बारा रुग्णांवर उपचार सुरू झाले आहेत. या रुग्णालयात ३० आयसीयू बेड, २०० बेड सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी उपचार करण्यासाठी तसेच ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुढील काळात आवश्यकतेनुसार बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे.
पालिकेचे रुग्णालय नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत असे आणि खाजगी रुग्णालयात प्रचंड खर्च येत असल्याने नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. आता पालिकेच्या रुग्णालयात विनामूल्य उपचार मिळणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
बदलापूर पश्चिमेकडील गौरी हॉलमध्ये सुरू करण्यात आलेले कोविड रुग्णालय मंगळवारपासून प्रत्यक्षात कार्यान्वित झाले असून येथे रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. आजच्या घडीला बारा रुग्ण दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले असल्याचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले. या रुग्णालयात बदलापूर मधील खाजगी डॉक्टर सेवा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना चाचणी केंद्रावर शेवटचे मशीन बसविण्याचे काम सुरू असून एक-दोन दिवसात हे केंद्रही कार्यान्वित होणार आहे. येथेही मोफत चाचणी केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले.

 329 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.