पोलिस अधिकाऱ्यावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई करा

भाजपाचे पोलिस आयुक्तांना निवेदन

ठाणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंब्रा येथील कार्यकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना आज निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
मुंब्रा येथील पोलिस उपनिरीक्षक सचिन सरडे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यापूर्वीही ऐन लॉकडाऊनमध्ये ठाण्यातील सामान्य नागरिक अनंत करमुसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या निवासस्थानी नेऊन मारहाण केली असल्याचा प्रकार घडला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मुजोरी उघड झाली. त्याचबरोबर ठाण्यातील सामान्य नागरिकांबरोबरच पोलिसांचाही जीव धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, सचिव संदीप लेले, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रिधा रशिद, सुजय पत्की आदी उपस्थित होते.
कोविडमुळे जारी लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. अशा परिस्थितीत पोलिसांवर झालेला हल्ला हा क्लेशदायक आहे, असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे यांनी केले. या प्रकरणी आपण अटक केलेल्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलचे `सीडीआर’ तपासून हल्ला करण्यासाठी फूस लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 476 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.