शहरातील टीएमटी आगार, तसेच सर्व एसटी स्टँडसमोर ‘डफली बजाओ’ आंदोलन छेडण्यात येणार
ठाणे : कोरोनाला अटकाव आणण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे गोरगरीबांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने तत्काळ लॉकडाऊन हटवावा; एसटी आणि टीएमटी सेवा सुरु करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचितचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, बुधवारी( दि. १२) शहरातील टीएमटी आगार, तसेच सर्व एसटी स्टँडसमोर ‘डफली बजाओ’ आंदोलन छेडण्यात येणार आहे. या संदर्भातील निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
कोरोनामुळे किती मृत्यू झाले आणि इतर कारणामुळे किती मृत्यू झाले. याची माहिती सरकारकडून दिली जात नाही. तरीही लॉकडाऊन लादून सर्व व्यवहार बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे टपरीवाले, फेरीवाले यांची आज उपासमार होत आहे. आज एसटी महामंडळावरही मोठ संकट आलं आहे. १० हजार लोकं एसटी महामंडळ कमी करणार असल्याची बातमी आली आहे. दोन महिने एसटीच्या कर्मचार्यांना पगार मिळालेला नाही. ठाणे जिल्ह्याचा विचार करता, सध्या कोरोनाच्या महामारीमुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची मोठी हानी होत आहे. सर्वच व्यवहार बंद असल्याने गोरगरीबांना जगणे असह्य होत आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हटविण्यात यावे; ठाणे शहरात टीएमटीच्या बसगाड्या सुरु कराव्यात; पश्चिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण आदी भागात जाण्यासाठी एसटी बससेवा सुरु करावी; ई-पास पद्धती बंद करावी; असंघटीत कामगारांना अर्थसाह्य देण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनालाा देण्यात आले. राजाभाऊ चव्हाण, जयंत बैले, अमर आठवले, सुरेश कांबळे, बंडू वावळे, जनार्दन इंगळे, मारुती गायकवाड, भाऊ भागवत, तुकाराम कांबळे, राजेश भागवत, रघु भोसले, अविनाश अहिरे, नितीन तायडे, ए.आर. पटेल, अशोक आहेर, राजाराम ढोलम, शांताराम भिवसन यांच्या या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.
दरम्यान, लॉकडाऊन हटवून गोरगरीब जनतेला रोजगाराची संधी द्यावी, अशी मागणी अनेकवेळा अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. मात्र, या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन सरकारला गरीब माणसालाच संपवायचे आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी डफली आंदोलन छेडण्याच्या सूचना बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्या आहेत. त्यामुळे या मागण्यांवर जर मंगळवारपर्यंत निर्णय घेण्यात आला नाही. तर, सबंध ठाणे शहरातील विविध टीएमटी आगार, एसटी डेपो, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आदी ठिकाणी ‘डफली बजाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राजाभाऊ चव्हाण यांनी दिली.
657 total views, 1 views today